नागपूर: महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाला आज पासून सुरुवात; शेतकरी ते वीर सावरकर यांच्या पर्यंत अनेक मुद्द्यांवरून चर्चेची शक्यता

हे अधिवेशन 21 डिसेंबर पर्यंत असणार असून या मध्ये शेतकरी कर्जमाफी ते स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरून सुरु असणारे वाद हे मुद्दे चर्चेत येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचे (Maharashtra Government) निवडणूक पश्चात पहिले वहिले हिवाळी अधिवेशन आज 16 डिसेंबर पासून नागपूर (Nagpur) मध्ये सुरु होणार आहे. हे अधिवेशन 21 डिसेंबर पर्यंत असणार असून या मध्ये शेतकरी कर्जमाफी ते स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरून सुरु असणारे वाद हे मुद्दे चर्चेत येण्याची शक्यता आहे. काल,अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारी चहापानावर बहिष्कार टाकत शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपयांच्या मदतीची मागणी व वीर सावरकर यांचा झालेला अपमान यावरून निषेध नोंदवला होता. ("महाराष्ट्रात पुढील 50 वर्षे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहील"– उद्धव ठाकरे)

प्राप्त माहितीनुसार, या अधिवेशनात प्रलंबित पुरवणी मागण्या मंजूर करणे हा कारभाराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे. याशिवाय अवकाळी पाऊस, फडणवीस सरकारच्या विविध प्रकल्पांना देण्यात आलेली स्थगिती, राज्याची आर्थिक स्थिती या मुद्द्यांवर देखील चर्चा होणार आहे.

नवख्या आमदारांचे पहिले अधिवेशन

आज पासून सुरु होणारी यंदाचे हिवाळी अधिवेशन हे अनेकांसाठी पहिला अनुभव देणारे असणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत एकूण 97 आमदार हे पहिल्यांदा निवडून आले आहेत, तर उद्धव ठाकरे हे देखील पहिल्यांदा मुख्यमंत्री म्ह्णून नागपुरात दाखल होणार आहेत.

खाते वाटपाचा मुद्दा

उद्धव ठाकरे यांचं सरकारने सत्तेत आल्यापासून अद्याप ठोस मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर केलेले नाही त्यामुळे हा मुद्दा विरोधी पक्ष उचलून धरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काल संध्याकाळी उद्धव ठकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा फडणवीस यांच्या पूर्व सरकारला टोला लगावत आम्ही वाचन पाळणारी लोक आहोत त्यामुळे शेतकरूयांपासून ते सावरकर व स्थगित प्रकल्पांपर्यंत सर्व ,मुद्दे वेळेत पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती, या सहा दिवसांच्या अधिवेशनात यातील नेमके कोणते मुद्दे खरोखरच चर्चेत येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.