Mumbai Police: चोरांची हिंमत वाढली, तब्बल 13 पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी एकाच वेळी चोरीची घटना

कारण नुकत्याच एका चोरीच्या घटनेत चोरांनी पोलीसांच्या घरी चोरी केल्याचे समजत आहे. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Mumbai Police | (Photo Credits: File Image)

Mumbai Police: चोरटे कधी पोलिसांच्या घरात चोरी करण्याची हिंमत करतील असं कोणाला वाटलं नसेल. पण, मुंबईतील चोरट्यांनी ही किमयाही केली आहे. चोरट्यांनी मुंबई पोलिसांच्या घरातच डल्ला मारल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या माहीम येथे असणाऱ्या पोलीस कॉलनीतील तेरा पोलिसांच्या घरात चोरीची घटना घडली आहे. या चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातून रोकड, मौल्यवान वस्तू, देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी केल्या आहेत. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनीच मोहीम पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.

पोलीस कॉलनीत जाऊन हातसफाई करणारे चोरटे हिंदी चित्रपटात पाहिले आहेत. मात्र, खऱ्या आयुष्यात या चोरट्यांनी मुंबई पोलिसांना नाकीनऊ आणले आहे. चोरट्यांनी रात्रपाळीवर असलेले पोलीस कर्मचारी, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना लक्ष केले. या घरांमधील वस्तू चोरऱ्या. तसेच पोलीस कॉलनीच्या शेजारील वसाहतीतील प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयांमध्ये देखील चोरी केली. तक्रार दाखल झाल्यानंतर आता माहीम पोलीस त्या चोरांचा शोध घेत आहेत.

चोरीची ही घटना 16 ते 17 ऑगस्ट दरम्यान घडली. अशी माहिती माहीम पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिली. ज्या घरांमध्ये चोरी झाली, त्या घरातील अधिकारी घरात नव्हते. घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी केली गेली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. त्यातून चोरांचा शोध घेतला जाणार आहे.

चोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांची घरे लक्ष केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस वसाहत सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य व्यक्तींची घरे कशी सुरक्षित राहणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.