Mumbai Weather Update: मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली, AQI 190 हून पुढे पोहोचला

कुलाबा येथे सोमवारी किमान तापमान 24 तर सांताक्रूझ येथे 23.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. दोन्ही केंद्रांवर रविवारपेक्षा किमान तापमान अधिक होते.

Mumbai AQI | (Photo courtesy: X/ANI)

मुंबईच्या हवेत (Mumbai Weather) गारठा हा वाढला असला तरी मात्र आता त्यासोबतच चिंतेत देखील वाढ झाली आहे. मुंबईच्या (Mumbai) हवेचा निर्देशांक सोमवारी मध्यम असला तरी मात्र वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता (Pollution Increases) वाईट या प्रकारात नोंदवली गेली आहे. मंगळवारीही मुंबईतील काही केंद्रांवरील हवा वाईट असेल, असा अंदाज सफर या संस्थेच्या माध्यमातून नोंदवण्यात आला आहे. मुंबईच्या हवेतील प्रदुषणात वाढ झाली असल्यामुळे नागरिकांनादेखील आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हे करण्यात आले आहे.  (हेही वाचा -Mumbai Weather Update: पुढील काही दिवसात मुंबईत थंडी वाढणार, राज्यातही कमाल तापमानात घट)

सोमवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 190 हून पुढे पोहोचला होता. कुलाबा येथे सोमवारी किमान तापमान 24 तर सांताक्रूझ येथे 23.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. दोन्ही केंद्रांवर रविवारपेक्षा किमान तापमान अधिक होते.  मुंबईच्या या दोन्ही केंद्रांवर किमान तापमान वाढले असले तरी मुंबईच्या काही भागांमध्ये मात्र थंडी ही जाणवत आहे. यासोबतच हवेत धुक्याचे प्रमाण देखील वाढले आहे. धुक्यामुळे मुंबईच्या वातावरणामध्ये प्रदूषके साचून राहण्याचे प्रमाण येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबईमध्ये वाऱ्यांचा वेग संथ असल्याने सकाळच्या वेळी प्रदूषके अधिक साचून राहतात, अशी माहिती सफरचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन घुगे यांनी दिली. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मंगळवारी 150च्या पुढे असू शकेल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार सोमवारी महापे, कांदिवली, शीव, बोरिवली, वरळी, मुलुंड, पवई, कुलाबा, कल्याण, वसई, मुंबई विमानतळ येथे हवेची गुणवत्ता मध्यम नोंदली गेली. तर नेरूळ येथे समाधानकारक नोंदली गेली.