Mumbai Water Taxi: बहुप्रतिक्षित मुंबई वॉटर टॅक्सी सेवेचे 17 फेब्रुवारी रोजी उद्घाटन; जाणून घ्या मार्ग व दर
वॉटर टॅक्सीचा वापर वाढल्यास मुंबईकरांचा इंधनावर होणार खर्च, तसेच रस्तेवाहतुकीत होणारी वाहतुक कोंडी, रेल्वेतील गर्दी आणि इतर बऱ्याच त्रासांपासून सुटका होऊ शकणार आहे
मुंबई (Mumbai) आणि नवी मुंबई (New Mumbai) दरम्यान कनेक्टिव्हिटीचे आश्वासन देणाऱ्या बहुप्रतिक्षित मुंबई वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवेचे उद्घाटन 17 फेब्रुवारी रोजी केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहवालानुसार, सुरुवातीला चारपैकी दोन ऑपरेटर आपली सेवा सुरू करतील. DCT-बेलापूर आणि DCT-JNPT मार्गांसाठी तात्पुरते दर अनुक्रमे 800 आणि 550 रुपये असतील. बेलापूरला जाण्यासाठी मासिक पाससाठी सुमारे 12,000 रुपये मोजावे लागतील. तीन दशकांपूर्वी पहिल्यांदा नियोजित केलेल्या या सेवेमुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट होईल.
सध्या तरी भाडे खूपच जास्त आहे, परंतु प्रवाशांची संख्या वाढल्याने हे दर कमी होतील. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सुरुवातीला वॉटर टॅक्सी पुढील तीन मार्गांवर चालतील-
- फेरी वार्फ, माझगाव येथील क्रूझ टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल
- बेलापूर आणि एलिफंटा लेणी
- बेलापूर आणि जेएनपीटी
भविष्यात अजून काही मार्गांचा विस्तार केला जाईल. इतर मार्गांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ते एलिफंटा, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते रेवस, करंजाडे, धरमतर, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते बेलापूर, नेरूळ, वाशी आणि ऐरोली, डीसीटी ते खांदेरी बेटे आणि जेएनपीटी यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Mumbai: सेंट्रल रेल्वेकडून मुंबई लोकलध्ये सुरु केली मोफत इंन्फोटेन्मेंट सेवा, प्रवाशांना सिनेमा-टीव्ही शो पाहता येणार)
वॉटर टॅक्सीचा वापर वाढल्यास मुंबईकरांचा इंधनावर होणार खर्च, तसेच रस्तेवाहतुकीत होणारी वाहतुक कोंडी, रेल्वेतील गर्दी आणि इतर बऱ्याच त्रासांपासून सुटका होऊ शकणार आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबई ते नवी मुंबई हा जलप्रवास वॉटरटॅक्सीने केल्यास तो अवघा 15-20 मिनीटांचा असेल. नवी मुंबईतून मुंबई शहरात कामधंदा आणि नोकरीसाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यामुळे या प्रवाशांच्या सेवेसाठी सुखकर मार्ग निवडण्याचे प्रयत्न पाठीमागील प्रदीर्घ काळापासून सुरु होते.