Mumbai Traffic Update: लोअर परेल पूलाची एक मार्गिका 18 सप्टेंबर पासून होणार खुली
त्यामुळे प्रभादेवी, वरळी, करी रोड आणि लोअर परेल भागात राहणार्यांना त्याचा फायदा होणार आहे.
मुंबईमध्ये (Mumbai) लोअर परेल (Lower Parel) भागामध्ये मागील 5 वर्ष दुरूस्तीच्या कामासाठी बंद केलेल्या पूलाची एक मार्गिका आता खुली होत आहे. 18 सप्टेंबर पासून या पूलावर मुंबईकरांना प्रवास करता येणार अअहे. लोअर परेल कडून प्रभादेवी कडे जाणारी मार्गिका 3 जूनला सुरू झाली होती त्यानंतर आता लोअर परेलकडून करी रोड कडे जाणारी एक मार्गिका सोमवारी सुरू होत आहे. त्यामुळे प्रभादेवी, वरळी, करी रोड आणि लोअर परेल भागात राहणार्यांना त्याचा फायदा होणार आहे.
सरकार कडून गणेशोत्सवापूर्वी लोअर परेलचा ब्रीज सुरू केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र या ब्रीजवरील काम पाहता ही घोषणा हवेतच विरणार का? असं मुंबईकरांना वाटत असताना आता एक मार्गिका सुरू होत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये गणेशोत्सवाचे दहा दिवस नंतर येणारी नवरात्र, दिवाळी यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. पण आता डिलाई रोड वरून वरळी, दादर कडे जाणारी मार्गिका होत असल्याने या कोंडीतून थोडा मोकळा श्वास घेता येईल अशी अपेक्षा आहे.
2018 मध्ये आयआयटी मुंबई ने धोकादायक पूलांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये लोअर परेलच्या या ब्रीजचा समावेश होता. त्यानंतर प्रशासनाने या पूलाचे पाडकाम सुरू केले. दरम्यान कोरोना संकट आले आणि याचे काम काही काळ रखडले. मात्र नंतर पालिकेने काम वेगवान करत पूल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत आणण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत.
एकीकडे लालबाग भागातील गणपतींमुळे गणेशोत्सवामध्ये दहा दिवस वाहतूक वळवलेले असते आणि दुसरी कडे लोअर परेलचा ब्रीज बंद त्यामुळे करी रोडच्या एका पूलावरून त्या भागातील वाहतूक पुढे सरकत होती पण आता या भागातील नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.