Mumbai Stations Names To Be Changed: मुंबईतील 'या' 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलली जाणार; केंद्राकडे पाठवला जाणार प्रस्ताव, खासदार Rahul Shewale यांची माहिती

मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले. बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक या निर्णयाला मान्यता देईल.

Mumbai Stations Names To Be Changed

Mumbai Stations Names To Be Changed: सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी देशातील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचे राजकारण जोरात सुरु झाले आहे. यूपीनंतर आता महाराष्ट्रातील काही रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत मुंबई भाजपचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) म्हणाले की, राज्य सरकारने मुंबईतील आठ उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे (Mumbai Suburban Stations) बदलण्यास तत्वतः मान्यता दिली आहे.

ते पुढे म्हणाले, रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नवे बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला घटनेने दिला आहे. या अधिकाराचा वापर करून राज्य सरकारने गृह मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाची परवानगी घेऊन मुंबईमधील रेल्वे स्थानकांची काही नावे बदलली आहेत. त्यानुसार एलफिस्टन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्यात आले, तर व्हीटी रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे नाव देण्यात आले आहे.

आता मुंबईतील इतर अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये करी रोडला लालबाग, सँड हर्स्ट रोडला डोंगरी, मरिन लाईन्सला मुंबा देवी, चर्नी रोडला गिरगाव, कॉटन ग्रीनला काळाचौकी, डॉकयार्ड रोडला माझगाव आणि किंग सर्कलला तीर्थंकर पार्श्वनाथ असे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. बॉम्बे सेंट्रलचे नाव बदलून नाना जगन्नाथ शंकरसेठ करण्याचीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. (हेही वाचा: मुंबईकरांना दिलासा! आजपासून सुरु झाला बहुप्रतीक्षित कोस्टल रोड; जाणून घ्या रस्त्यावरून प्रवास करण्याच्या वेळा आणि वेग मर्यादा)

राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके आजही ब्रिटिशकालीन नावाने ओळखली जातात. मात्र, या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील इतिहास पाहता, या स्थानकांच्या नामांतराची मुंबईकरांची मागणी आहे. अनेक वर्षांपासून हे प्रस्ताव प्रलंबित होते, मात्र त्यावर कधीही विचार झाला नसल्याचे खासदार म्हणाले. आता महाराष्ट्र मंत्रिमंडळाने या प्रस्तावांवर विचार केला असून लवकरच ही नवीन नावे वापरात येऊ शकतात. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले. बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक या निर्णयाला मान्यता देईल.