आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बिघडली; उपचारांसाठी मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल
रक्तदाबाचा त्रास आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने शिवेंद्र राजे यांना साताराहून (Satara) मुंबईकडे (Mumbai) रवाना झाले असून त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
भाजपा आमदार आणि शिवरायांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान रक्तदाबाचा त्रास आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने शिवेंद्र राजे यांना साताराहून (Satara) मुंबईकडे (Mumbai) हलवण्यात आले आहे. दरम्यान काल (18 फेब्रुवारी) रात्री शिवेंद्रराजेंना रक्तदाबाचा त्रास (Blood Pressure) सुरू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सातार्यातील प्रतिभा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र नंतर प्रकृती थोडी स्थिर झाल्यानंतर आज सकाळी शिवेंद्रराजे भोसले पुढील उपचारांसाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.
शिवेंद्रराजेंसोबत त्यांची पत्नी वेदांतिका राजे देखील रूग्णालयात त्यांच्यासोबत होत्या. दरम्यान आता मुंबईच्या लीलावती रूग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. काल रात्री शिवेंद्रराजे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे.प्राथमिक माहितीनुसार, शिवेंद्र राजेंचा रक्तदाब वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. काल एका कार्यक्रमासाठी शिवेंद्रराजे फलटणला गेले होते. तेथून परतल्यानंतर रात्री अस्वस्थ वाटत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सातारा - जावळी विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले आमदार म्हणून निवडून आले आहेत. निवडणूकींच्या तोंडावर शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी 30 जुलै 2019 ला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. पुढे सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या शिवेंद्रराजेंनी पुन्हा आमदारकी मिळवली.