मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत राहणार बंद, असा करा प्रवास
या महामार्गावर शेडुंग फाट्याजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सूचना फलक लावण्याचे काम घातले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai-Pune Express Way) आज (27 सप्टेंबर) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या महामार्गावर शेडुंग फाट्याजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सूचना फलक लावण्याचे काम घातले आहे. यासाठी या मार्गावरील वाहतूक दुपारी 12 ते 2 या वेळेत बंद ठेवण्यात आली आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, वाहनचालकांनी कळंबोली (Kalamboli) येथून सुरू होणाऱ्या द्रुतगती महामार्गावर न जाता पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग कळंबोली येथून सायन-पनवेल महामार्गावरून सुरू होतो. महामार्ग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही किलोमीटरवर शेडुंग फाटा आहे. शेडुंग फाट्याजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सूचना फलक लावण्याचे काम हाती घेतले आहे. ओव्हरहेड गँन्ट्री प्रकारचे काम असल्यामुळे सूचना फलक लावण्यासाठी वाहने बंद करावी लागणार आहेत. हे काम पुर्ण होण्यासाठी दोन तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे दोन तासांत पूर्ण करून महामार्ग पुन्हा सुरळीत करण्यासाठी रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलीस प्रयत्नशील असतील.
हेही वाचा- मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुन्हा वाहनांसाठी 80kmph वेग ठेवण्यात येणार
या कालावधीत खालापूरपर्यंतचा प्रवास करणा-या वाहनांना द्रुतगती मार्गावरून करता येणार नाही. त्यामुळे वाहनांनी कळंबोली सर्कल येथून जुना-मुंबई पुणे महामार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असा करता येईल प्रवास:
कळंबोली सर्कल येथून डी पॉइंटमार्गे पळस्पे फाटा, पनवेलमधून पळस्पे फाटा मार्गावरून जाऊन थेट खालापूर येथे द्रुतगती मार्गावर जाता येणार आहे. याच कालावधीत मुंबई-पुणे राज्य महामार्गावर एकाच वेळी वाहनांची गर्दी होऊन कोंडी होण्याची शक्यता असल्यामुळे अवजड वाहने द्रुतगती मार्गावर 6 किलोमीटरनंतर थांबविण्यात येणार आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. पुजारी यांनी दिली.