Mumbai: भाजपचा 'तो' पदाधिकारी निघाला बांगलादेशी, बनावट कागदपत्रांद्वारे भारतात वास्तव्यास; गृहमंत्री अनिल देशमुख यांची महिती 

पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रुबेल शेख हा बांगलादेशातील जसुर जिल्ह्यातील बोवालिया गावचा आहे. 2011 मध्ये त्याने कोणत्याही कागदपत्रांविना भारतात प्रवेश केला.

Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

मुंबई पोलिसांनी नुकताच अवैधपणे भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी व्यक्तीला (Bangladeshi Immigrant) अटक केली आहे. ही व्यक्ती बराच काळ भाजपाच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीचे नाव रुबल जोनु शेख (Rubel Jonu Sheikh) असे सांगण्यात आले असून, बनावट कागदपत्रांद्वारे तो भारतात वास्तव्याचा आरोप केला आहे. आता चौकशीत ही व्यक्ती बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार त्यांना प्राप्त झाली होती.

या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे. सध्या बेल जोनू शेख याला अटक करण्यात आली आहे. रुबेल हा भाजपाचा पदाधिकारी असून या पक्षाने कोणतीही शहानिशा न करता त्याला पद कसे दिले? बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काही समाज विघातक कार्य केल्यास, त्याची जबाबदारी भाजप घेणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला होता. तसेच ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याने याची चौकशी करण्याबाबतचे निवेदन त्यांनी केले होते.

चौकशीदरम्यान शेखच्या घरात प. बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा–24 उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवाशी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा– नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखला मिळाला होता. याबाबत  चौकशी केली असता रुबेल जोनू शेख याचा नावाचा कोणताही रहिवाशी दाखला देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नादिया प. बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता रुबेलकडे असलेला दाखला हा दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर असलेल्याचे समोर आले. (हेही वाचा: 'माझा फोन टॅप होत असल्याचा दाट संशय'; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट)

अशाप्रकारे याच सर्व खोट्या कागदपत्रांच्या आधारावर त्याचे आधार कार्ड व पॅनकार्ड सुद्धा काढल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रुबेल शेख हा बांगलादेशातील जसुर जिल्ह्यातील बोवालिया गावचा आहे. 2011 मध्ये त्याने कोणत्याही कागदपत्रांविना भारतात प्रवेश केला.