दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल
मुंबई पोलिसांनी वाहतुकीसाठी आणि विसर्जनासाठी असलेल्या रस्त्यांची माहिती ट्विटद्वारा शेअर केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रभर गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांना तसेच त्यांच्या गर्दीमुळे इतर वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल
मुंबई पोलिसांनी शहरात वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ नये म्हणून आधीच काही पर्यायी मार्गांची आणि वाहतुकीमध्ये केलेल्या बदलांची माहिती दिली ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
कोणकोणत्या भागात केले बदल ?
दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटी, पवई तलाव आणि शीतल तलाव, जुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी आणि मध्य तसेच दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत.
प्लॅस्टिकबंदीचं आवाहन
यंदा गणेशोत्सवाच्या काळात प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर न करण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांमध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन केले जाऊ शकते तसेच काही इको फ्रेंडली गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी खास कृत्रिम तलावं खुली करण्यात आली आहेत.