Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
अधिकारी तपास करत आहेत, संशयित व्यक्तीची ओळख मनोरुग्ण महिला अशी झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Threat) यांच्या हत्येचा कट रचल्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहतूक नियंत्रण कक्षाला आल्याने गुरुवारी (28 नोव्हेंबर) जोरदार खळबळ उडाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन करणारी व्यक्ती एक महिला आहे. तिने केवळ मनस्तापातून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी महिलेचा ठावठिकाणा शोधला असून,अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फोन करणारी महिला मनोरुग्ण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणारी संशयित महिला मनोरुग्ण आहे. तिची मानसिक स्थिती ठिक नसते. असे असले तरी, तिने धमकी देण्याचे नेमके कारण शोधण्यात पोलीस सध्या व्यग्र आहेत. तिला तातडीने अटक करुन चौकशी करणे हे पोहिसांचे प्रमुख काम राहणार आहे. पोलिसांनी म्हटले की, आम्ही घटनेचा संपूर्ण मागोवा घेतला आहे. फोन नेमका कोठून आला आणि कोणत्या क्रमांकावरुन आला याबाबत माहिती मिळाली आहे. दरम्यान, संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात येणार आहे. सर्व प्रोटोकॉल तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
पाठिमागील वर्षीही धमकीचा फोन
दरम्यान, जीवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल्स येणे आजकाल नवे राहिले नाही. या आधी गेल्या वर्षी जुलै महिन्यातही अशाच प्रकारचा धमकीचा फोन आला होता. या घटनेत एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी दिली आणि देशात 26/11 सारखा हल्ला होण्याचा इशारा दिला.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या आणखी एका घटनेत, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी (Lawrence Bishnoi Gang) संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा धमकीचा फोन आल्यानंतर शिवसेना हरियाणा प्रभारी विक्रम सिंग यांनी सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली. रोहित गोदारा म्हणून स्वतःची ओळख करून देणाऱ्या फोनकर्त्याने 11 नोव्हेंबर रोजी यूकेच्या नंबरवरून केलेल्या व्हॉट्सअॅप कॉल दरम्यान सिंगच्या व्यवसायात वाटा मागितला. सिंह यांनी आरोप केला की, फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.