करियर मधील अपयशाने खचलेल्या तरूणाला सतर्क Mumbai Police नी आत्महत्येपासून केलं परावृत्त; एका ट्वीटने फिरली सारी सूत्रं

मोबाईल ट्रॅक करत पोलिसांनी तरूणाचा शोध घेत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केलं आहे.

Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

आयुष्यात करियर मध्ये सातत्याने अपयश येत असल्याने खचलेल्या एका तरूणाने आत्महत्या (Suicide) करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) ट्वीट करत 'मी आत्महत्या करत आहे. मृत्यूपश्चात माझी देहदानाची इच्छा आहे'. असं सांगितलं. मुंबई पोलिसांनी या ट्वीट वरून प्रसंगाचं गांभीर्य ओळखत तातडीने या तरूणाचा शोध सुरू केला. मोबाईल ट्रॅक करत पोलिसांनी तरूणाचा शोध घेत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केलं आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, या तरूणाचा मोबाईल दादर, घाटकोपर आणि पुढे कर्जत मध्ये ट्रक झाला. पोलिसांनी या मोबाईल लोकेशननुसार संबंधित पोलिस आणि सायबर ब्रांचला माहिती दिली. अखेर कर्जत मध्ये 9 तासांच्या अथक परिश्रमांनंतर तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर काऊंसलिंग साठी बीकेसीमध्ये त्याला नेण्यात आलं.

तरूण मुलगा 12वी उत्तीर्ण आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. 2019 मध्ये कोरोना संकट धडकलं. मुंबई मध्ये या तरूणाने सुरूवातीला चहाचा स्टॉल सुरू केला होता या कोविड संकटात बंद पडला. दरम्यानच्या काळात त्याने मित्राकडून कर्ज घेतलं होतं. त्यावरच दिवस ढकलले. नंतर ट्रेन मध्ये चिक्की विकण्यास सुरूवात केली पण हा व्यवसाय देखील त्याच्या कर्जात भर टाकणाराच ठरला त्यामुळे आर्थिक विवंचनेतून नैराश्याकडे गेलेल्या या मुलाने अखेर आतमहत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान त्याने आत्महत्येपूर्वी ट्वीट केल्याने पोलिस सतर्क झाले. रात्रभर त्यांनी केलेल्या पाठलाग आणि शोधाशोधीमुळे एका तरूणाचा जीव वाचला आहे. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचे सध्या सर्वत्रच कौतुक होत आहे.