कोविड-19 मुळे मुंबई पोलिस दलातील 4 पोलिसांनी एकाच दिवशी गमावले प्राण; ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
यात अनेकांनी कोरोनावर मात केली असली तरी काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबई (Mumbai) भोवती कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वेढा दिवसागणित अधिक मजबूत होत आहे. कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेले पोलिसही कोविड-19 (Covid-19) च्या विळख्यात अडकले आहेत. यात अनेकांनी कोरोनावर मात केली असली तरी काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक लोळे, पोलीस हवालदार अनिल कांबळे, पोलीस हवालदार हेमंत कुंभार, पोलीस नाईक संदेश किणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसंच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. (महाराष्ट्र: मुंबई पोलीस दलातील 4 कर्मचाऱ्यांचे गेल्या 24 तासात Coronavirus मुळे निधन)
मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले, "सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक लोळे, पोलीस हवालदार अनिल कांबळे, पोलीस हवालदार हेमंत कुंभार, पोलीस नाईक संदेश किणी यांच्या मृत्यूबद्दल कळविण्यास खेद होत आहे. ते कोरोना व्हायरसशी झुंज देत होते. त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम असतील."
Mumbai Police Tweet:
11 जून रोजी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई पोलिस दलातील तब्बल 2028 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर मुंबईत तैनात असलेल्या SRPF च्या 82 जणांना कोविड-19 चा संसर्ग झाला आहे. दरम्यान कोरोना व्हायरस बाधित पोलिस आणि SRPF च्या जवानांवर योग्य उपचार आणि उत्तम सुविधा मिळतील, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.