Coronavirus In Maharashtra: कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी मुंबईत कलम 144 लागू; 31 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश

दिवसागणित कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) राज्यातील वाढता प्रभाव पाहता मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे राज्यात एकूण 32 रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणित कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले  आहेत. तसंच जमावबंदीचा हा आदेश 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे या काळात टुर्सवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मुंबई दर्शन, बिझनेस टुर्सही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन संस्थांनी टुर्स आयोजित न करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

यापूर्वी ही सरकारने स्वच्छता पाळण्यासोबतच गर्दीची ठिकाणं टाळण्याचे आवाहन वारंवार केले होते. मात्र राज्यातील कोरोना व्हायरसची वाढती संख्या लक्षात घेता परिस्थिती आटोक्यात राहण्यासाठी जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. (महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ; औरंगाबाद येथील 59 वर्षीय महिलेला कोरोना व्हायरसची लागण)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात तसंच परदेशात प्रवास करण्यास मनाई केली आहे. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला प्रवास करावा लागला तर त्यांना पोलिस कमिशनर ऑफिसमधून परवानगी घेणे बंधनकारक असेल.

आदित्य ठाकरे ट्विट:

पोलिसांनी दिलेले आदेश हे प्रायव्हेट टुर्स ऑपरेटर्ससाठी असून बिझनेस आणि पर्यटनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या टुर्सवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. तरी देखील कोणावर अशाप्रकारची सक्ती केली गेल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 32 झाली असून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील शाळा, कॉलेज, सिने-नाट्यगृहे, मॉल्स, बगिचे, जिम आणि स्विमिंग पूल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.