मुंबई: सर्जिकल मास्क पुरवण्याच्या बहाण्याने एका महिलेला 4 लाख रुपयांचा गंडा; आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश
अबरार मुश्ताक असे या आरोपीचे नाव असून त्याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे बाजारात मास्क, सॅनिटायझर यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे यांच्या किंमतीत वाढ झाली असून यासंदर्भातील अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. अशीच एक फसवणूकीची घटना मुंबईतून (Mumbai) समोर आली आहे. सर्जिकल मास्क पुरवण्याच्या बहाण्याने एका महिलेला चार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. अबरार मुश्ताक (Abrar Mushtaq) असे या आरोपीचे नाव असून त्याला पकडण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आले आहे. भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबई येथून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मास्क आणि सॅनिटायझर यांच्या वाढत्या मागणीमुळे होणारा काळाबाजार रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यापूर्वी पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून बनावट सॅनिटायझर विकणाऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी त्यांना अटक केली होती. (पुणे येथील एका दुकानातून तब्बल लाखांचे बनावट sanitizers जप्त; सॅनिटायझर, मास्कचा काळा बाजार रोखण्यासाठी पोलिस सज्ज)
ANI Tweet:
कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि हँड सॅनिटायझर यांचा समावेश सरकारने जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. मात्र याचा फायदा घेताना नागरिकांना फसवणूकीला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी वापरलेले मास्क धुवून विकत असल्याची एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती.