Mumbai Metro Line-3: मुंबईकरांसाठी 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार मुंबई मेट्रो लाईन-3 चा BKC-Aarey JVLR टप्पा; जाणून घ्या वेळापत्रक
12 किलोमीटर अंतरावर 10 प्रमुख स्थानके आहेत. ही मेट्रो उपनगरांना शहरातील प्रमुख भागांशी जोडेल. या मार्गावरून दररोज 17 लाख लोक प्रवास करतील, त्यामुळे रस्त्यावरील 6.5 लाख वाहनांचा भार कमी होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबई मेट्रो लाइन 3 (Mumbai Metro Line-3) च्या बीकेसी ते आरे जेव्हीएलआर विभागाचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी या पूर्णपणे भूमिगत एक्वा लाइन मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला. मुंबई मेट्रो लाइन-3 हा मुंबई शहर आणि उपनगरांमधील गतिशीलता सुधारण्याच्या उद्देशाने एक प्रमुख सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे. आरे जेव्हीएलआरला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनशी जोडणारी बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो लाईन-3 ही उद्या, 7 ऑक्टोबर 2024 पासून सर्वसामान्यांसाठी खुली होईल. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने शनिवारी ही घोषणा केली. उद्या ही सेवा सकाळी 11:00 ते रात्री 8:30 पर्यंत उपलब्ध असेल.
मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पीएम मोदींनी या मेट्रो मार्गावरून प्रवासही केला. भूमिगत मेट्रोमध्ये प्रवास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पीएम मोदींनी स्टेशनचीही पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशिवाय राज्यपालही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी मेट्रो कनेक्ट 3 मोबाईल ॲपही लाँच केले.
नवीन मेट्रो मार्गामुळे वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि मुंबईकरांना उपनगराच्या या महत्वाच्या आणि गजबजलेल्या भागात जलद, अधिक सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. उद्या ही सेवा सुरु झाल्यानंतर, पुढे 8 ऑक्टोबर 2024 पासून, सोमवार ते शनिवार सकाळी 6:30 ते रात्री 10:30 पर्यंत आणि रविवारी सकाळी 8:30 ते रात्री 10:30 पर्यंत गाड्यांसह नियमित सेवा सुरू होतील. (हेही वाचा: Thane Integral Ring Metro Rail: ठाणेकरांसाठी खुशखबर! शहरात बांधला जात आहे 29-किमी लांब इंटिग्रल रिंग मेट्रो मार्ग, असतील 22 स्थानके, जाणून घ्या मार्ग व प्रकल्प तपशील)
Mumbai Metro Line-3-
ही मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो आहे. 12 किलोमीटर अंतरावर 10 प्रमुख स्थानके आहेत. ही मेट्रो उपनगरांना शहरातील प्रमुख भागांशी जोडेल. या मार्गावरून दररोज 17 लाख लोक प्रवास करतील, त्यामुळे रस्त्यावरील 6.5 लाख वाहनांचा भार कमी होईल. नरिमन पॉइंट, बीकेसी आणि सिप्झसारख्या 6 प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारा हा मेट्रो मार्ग मुंबईकरांसाठी वरदानापेक्षा कमी नाही.
तिकीट दर-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील मेट्रो 3 या मार्गिकेवरील आरे ते बीकेसी हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत. सीप्झ स्टेशनसाठी 10 रुपये आणि एमआयडीसी अंधेरी व मरोळ नाकासाठी 20 रुपये तिकीट असेल. पुढे आरेपासून सांताक्रूझ आणि वांद्रे या स्थानकांसाठी 40 रुपये तिकीट आकारले जाईल.