Badlapur Metro News: अंबरनाथ-बदलापूर मेट्रोमुळे थेट नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशी जोडणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती

3 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते.

Metro | Twitter

भविष्यात मेट्रो 14 बदलापूर मेट्रोची (Badlapur Metro) उभारणी झाल्यानंतर अंबरनाथ-बदलापूर (Ambernath-Badlapur) हा भाग या मेट्रोमुळे थेट नवी मुंबई-ठाणे-भिवंडी (Navi Mumbai-Thane-Bhiwandi) या शहरांशी जोडला जाईल, अशी महत्वाची माहिती खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी दिली. कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात होत असताना खासदार शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. आज कल्याण शीळ रोडवरील कोळेगाव येथे मेट्रो 12च्या पायाभरणीला सुरुवात झाली आहे.  (हेही वाचा - E- Bus Service: कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरात धावणार ई बस, एकात्मिक परिवहन योजना राबविणार)

कल्याण शीळ रस्त्यालगत कोळेगाव येथील नवीन पलावा रस्त्यावर या मेट्रोच्या पायाभरणीला सुरुवात झाली आहे. 3 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्यानंतर आठवडाभरात या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले, ' कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग हा शहरासह ग्रामीण भागातूनही जाणारा हा पहिलाच मेट्रो मार्ग आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी 5 हजार 865 कोटी रुपयांचा खर्च या मार्गासाठी होणार आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर हा भाग या मेट्रोमुळे नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या शहरांशी जोडला जाईल. तसेच मेट्रो 5 ची संलग्नता मुंबई मेट्रोशी आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सोडल्यास मेट्रोने मुंबई, नवी मुंबई, ठाणे यांसारखी शहरे गाठता येतील, असं खासदार शिंदे यांनी सांगितले. या मार्गावर कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोलोगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा ही स्थानके आहेत.