Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खुशखबर! मार्चपासून 'मेट्रो 2 A’ आणि 'मेट्रो 7' मार्ग सुरु होण्याची शक्यता
या सेवांमुळे वाहतूक कोंडी किमान 10 ते 15 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. शिवाय लोकल गाड्यांमधील गर्दीही कमी होण्याची अपेक्षा आहे
सध्या मुंबईमध्ये (Mumbai) बेस्ट बस आणि लोकलसोबत मेट्रोसेवादेखील (Mumbai Metro) लोकांची जीवनवाहिनी बनली आहे. मेट्रो सुरु झाल्यापासून मुंबईच्या वाहतुकीवरचा ताण बराच कमी झाला आहे. आता मुंबईकरांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. 'मेट्रो 2A' (दहिसर ते डीएन नगर) आणि 'मेट्रो 7' (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्ग मार्चपर्यंत प्रवाशांसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच ट्रॅफिक जॅमपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.
मेट्रो ट्रॅकची सुरक्षा चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही सेवा कार्यान्वित होईल, असे अहवालात म्हटले आहे. या सेवांमुळे वाहतूक कोंडी किमान 10 ते 15 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. शिवाय लोकल गाड्यांमधील गर्दीही कमी होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो लाईन 2B (DN नगर ते मंडाळे), मेट्रो लाईन 4 आणि 4A (वडाळा-कासारवडवली-गायमुख), मेट्रो लाईन 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो लाईन 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी), आणि मेट्रो लाईन 9 (अंधेरी) CSIA आणि दहिसर ते मीरा भाईंदर) हे इतर कॉरिडॉर एमएमआरडीए बांधत आहे.
MMRDA नुसार, या सर्व मेट्रो मार्गांची सिव्हिल कामे आधीच सुरू झाली आहेत आणि 2022-2024 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, MMRDA ने मेट्रो लाईन 7, 7A आणि 9 साठी भाईंदरमधील राय मुर्ढे येथे नवीन ठिकाणी प्रस्तावित डेपोची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. (हेही वाचा: Nagpur To Mumbai Bullet Train: नागपुरातुन मुंबईत 3.5 तासात पोहोचणार, 350 किमी वेगाने धावणार बुलेट ट्रेन, जाणून घ्या सर्वकाही)
यापूर्वी, दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) जमिनीवर फक्त लाइन 7 चा डेपो प्रस्तावित होता. अधिकाऱ्याने सांगितले की, ‘भूसंपादनाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. त्यांचे कार्यालय भूसंपादन करेल आणि एमएमआरडीए खाजगी मालकीची जमीन असल्याने नुकसानभरपाई देईल. ते पूर्ण झाल्यावर डेपोच्या बांधकामाची इतर कामे सुरू करता येतील.’