Mumbai Metro Extends Operational Hours: गणेशोत्सवादरम्यान मुंबई मेट्रोने कामकाजाचे तास वाढवले; जाणून घ्या सुधारीत वेळा
हे लक्षात घेता ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल.
Mumbai Metro Extends Operational Hours: गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई मेट्रोने आपल्या कामकाजाच्या वेळेत वाढ करण्याची घोषणा केली आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्थी उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी, ७ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत धावतील. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि महा मुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे, यांनी ही घोषणा केली आहे. उत्सवाच्या काळातील वाढीव फेऱ्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी परिवहन सेवा वाढविण्यावर त्यांनी भर दिला आहे.
गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली असते. हे लक्षात घेता ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल. गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत सहभागी झालेल्या भाविकांना आपापल्या घरी पोहचता यावे, हा या विस्तारीत सेवेचा उद्देश आहे. (हेही वाचा: Pune Metro Extends Operating Hours: गणेशोत्सवात पुणेकरांना दिलासा! मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार, जाणून घ्या वेळा)
जाणून घ्या कामकाजाच्या वाढलेल्या सेवा-
१. गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री १०:२०, १०:३९, १०:५० आणि ११ वाजता (४सेवा)
२. अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली: रात्री १०:२०, १०:४०, १०:५० आणि ११ वाजता (४सेवा)
३. गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा)
४. अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा)
५. दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम: रात्री १०:५३, ११:१२, ११:२२ आणि ११:३३ वाजता (४सेवा)
६. दहिसर (पूर्व) ते गुंदवली: रात्री १०:५७, ११:१७, ११:२७ आणि ११:३६ वाजता (४सेवा)
यासह वर्सोव्याहून शेवटची मुंबई मेट्रो ट्रेन रात्री ११.२० ऐवजी १२.१० वाजता घाटकोपरला रवाना होईल. घाटकोपरहून वर्सोव्याला जाणारी अंतिम मुंबई मेट्रो ट्रेन रात्री ११.४५ ऐवजी १२.४० वाजता सुटेल. दरम्यान, पुणे मेट्रोनेही आपल्या दोन्ही मार्गांवर- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते दिवाणी न्यायालय आणि वनाझ ते रामवाडी, कामकाजाचे तास वाढवले आहेत. उद्या, 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत पुणे मेट्रो दररोज 17 तास म्हणजेच सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.