Mumbai Metro 3 Project: मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा सप्टेंबरपासून सुरू होणार; डिसेंबर 2024 च्या आधी पूर्ण होणार संपूर्ण प्रकल्प

याचा सिप्झ ते बीकेसी पहिला टप्पा सप्टेंबर 2024 पर्यंत आणि डिसेंबर 2024 अखेरीपर्यंत पूर्ण प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन आहे.

Mumbai metro

Mumbai Metro 3 Project: बुधवारी झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्र सरकारने मुंबई मेट्रो 3 प्रकल्प (Mumbai Metro 3) डिसेंबर 2024 च्या आधी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा सिप्झ- सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान धावेल. हा प्रकल्प डिसेंबर 2024 अखेर पूर्ण होईल, जो सुरुवातीला सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित होते. मुंबई मेट्रो-3 लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या हिश्श्याची 1,163 कोटी एवढी रक्कम एमएमआरडीएला देण्याऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पाची सुधारित किंमत 37 हजार 275 कोटी 50 लाख असून, प्रकल्पाचे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. याचा सिप्झ ते बीकेसी पहिला टप्पा सप्टेंबर 2024 पर्यंत आणि डिसेंबर 2024 अखेरीपर्यंत पूर्ण प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन आहे. मुंबई मेट्रोची लाइन 3 (एक्वा लाइन) ही मुंबई शहरातील जलद ट्रान्झिट मेट्रो लाइन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1,130 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे, त्यापैकी 215.80 हेक्टर जमीन आतापर्यंत संपादित करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी सरकारने यापूर्वीच 2,341.71 कोटी रुपये दिले आहेत. (हेही वाचा: Mumbai Mahalakshmi Race Course: बीएमसीने घेतला महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जमिनीचा ताबा; उभे राहणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क)

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे ट्रेन ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी बॅकअप ऑपरेशन आणि कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो म्हणजेच मेट्रो 3ची चाचणी यशस्वीपणे पार पाडली आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जुलैमध्ये सेवा सुरू होईल, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गजबजलेल्या शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. मेट्रो 3 ही लाईन कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी 33.5-किमी लांबीची आहे. हा भूमिगत कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरवर 27 स्थानके असून, त्यातील 26 भूमिगत आणि एक जमिनीवर आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी, दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी आणि तिसऱ्या टप्प्यात वरळी ते कुलाबा दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.