Mumbai Local Mega Block: रविवारी मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, टाईमटेबल पाहूनच करा प्रवासाचे नियोजन

पश्चिम रेल्वेमार्गावर दिवसा मेगाब्लॉक नाही त्यामुळे या मार्गावर प्रवासी सुरळीत प्रवास करू शकतात.

Mega Block | (File Image)

मुंबईकरांची लाईफलाईन अर्थात मुंबई लोकल (Mumbai Local)  मेगा ब्लॉक (Mega Block) मुळे मध्य आणि हार्बर मार्गावर काही काळ प्रवाशांच्या सेवेत नसणार आहे. मुंबईच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक हा घेण्यात येणार आहे. देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम- मुंबई सेंट्रल अप जलद मार्गावर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताच मेगाब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.5 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून धिम्या मार्गावरून सुटणाऱ्या लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील, तर मुलुंड स्थानकापुढे या लोकल पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

तर हार्बर मार्गावर सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11. 10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक हा असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन लोकल, वांद्रे आणि गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत, तर पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.

पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीम अप जलद मार्गावर आणि पाचव्या मार्गिकेवर शनिवारी रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा सांताक्रूझ – चर्चगेट स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.