IPL Auction 2025 Live

Alibaug Ro-Ro Ferry: मुंबई-मांडवा रो रो सेवा आजपासून पुन्हा सुरु; ऑनलाईन तिकीट बुकींगची सोय

गुरुवार (20 ऑगस्ट) पासून भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो-रो सेवाचा प्रारंभ होत आहे.

Roro Service (Photo Credits: Facebook)

मुंबई-मांडवा (Mumbai-Mandwa) सागरी मार्गावरील रो-रो सेवा (Ro-Ro Service) आजपासून पुन्हा सुरु होत आहे. गुरुवार (20 ऑगस्ट) पासून भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो-रो सेवाचा प्रारंभ होत आहे. यामुळे अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन येथे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 15 मार्च रोजी रो-रो सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांतच ती बंद करावी लागली होती. आता गणेशोत्सवासाठी ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. रो-रो सेवेची ऑनलाईन बुकींग देखील सुरु करण्यात आली आहे.

आज सकाळी 9.15 मिनिटांनी पहिली बोट मुंबईतील भाऊचा धक्क्यावरुन मांडवासाठी रवाना झाली. संध्याकाळी 4 वाजता ही बोट परत मुंबईच्या दिशेने निघेल. गणेशोत्सवा दरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे हे वेळापत्रक 30 ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसादा पाहुन यात बदल करण्यात येतील अशी माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली आहे.

एम २ एम फेरी सव्‍‌र्हिसेसच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही रो-रो बोटीच्या प्रवासासाठी ऑनलाईन बुकींग करु शकाल. बोटीमध्ये सोशल डिस्टंसिंग नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. या सेवेमुळे महामार्गावरुन वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. परिणामी प्रवाशांचा प्रवासही सुखकारक होण्यास मदत होईल.

दरम्यान यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. तसंच घरगुती गणपती, सार्वजनिक गणेश मंडळं यांसाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईहून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी देखील काही नियम लागू करण्यात आले आहेत.