Mumbai Local Trains Update: सहकारी आणि खाजगी बँकांच्या 10% कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी
राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
सहकारी आणि खाजगी बँकांच्या (Cooperative, Private Banks) 10% कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची परवानगी रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railways) देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व सहकारी आणि खाजगी बँकांच्या कर्मचाऱ्यांपैकी 10% अधिक कर्मचाऱ्यांना बँकांमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मिळालेले 10% कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून QR code देण्यात येईल. तोपर्यंत अधिकृत ओळखपत्राद्वारे रेल्वे स्टेशनवर प्रवेश करण्याची परवानगी मिळेल. काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सवर जादा बुकींग काऊंटर्स सुरु करण्यात येतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरस संकट काळात जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय नियमांचे आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना केले आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील कर्माचारी वगळता इतर कोणीही रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असेही सांगण्यात आले आहे. तसंच कोरोना व्हायरस संकटकाळात सार्वजनिक वाहतूक नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहे. केवळ शासकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आता सहकारी आणि खाजगी बँक कर्मचाऱ्यांनाही रेल्वेने प्रवास करता येणार आहे.
विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या 150 अधिक फेऱ्या 21 सप्टेंबरपासून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत दिवसाला 350 लोकल फेऱ्यांची संख्या 500 करण्यात आली आहे. तसंच शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी बसेसची सोय देखील करण्यात आली आहे. (शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी 21 सप्टेंबरपासून विशेष एसटी सेवा; येथे पहा वेळापत्रक)
दरम्यान, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1167496 झाला असून त्यापैकी 300887 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 834432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, राज्यात एकूण 31791 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील 1167496 रुग्णांपैकी मुंबईची रुग्णसंख्या 180668 इतकी आहे.