Mumbai Local Train Update: विजपुरवठा खंडीत, तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबई लोकल 30 मिनीटे उशिरा

Mumbai Central Railway News: कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान वीज बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या सेंट्रल लाइनवरील लोकल ट्रेन सेवा 14 डिसेंबर रोजी विस्कळीत झाली, ज्यामुळे प्रवाशांना 30-40 मिनिटे उशीर झाला.

Mumbai Local Train | Photo Credit- X

मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन (Mumbai Train Delays) शनिवारी (14 डिसेंबर) सकाळपासून 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत. कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान (Kalyan-kasara Train Update) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या मध्य मार्गावरील लोकल सेवा (Central Railway News) धावत असल्याचे कारण सांगितले जात आहे. दरम्यान, या व्यत्ययामुळे सकाळच्या प्रवाशांची आणि कार्यालयाला जाणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेक नागरिकांना कार्यालयीन वेळा पाळता आल्या नाहीत. सबब काहींनी रस्ते प्रवासाचा मार्ग पत्करला. पण त्यामुळे रस्तेवाहतूकीचा पर्याय निवडून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अचानक वाढलेल्या गर्दीचा सामना करावा लागला.

अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूकीवर परिणाम

प्राप्त माहितीनुसार, मध्य रेल्वे विभागासाठी टाटा वीजपुरवठा प्रणालीमध्ये विजेच्या समस्येमुळे पहाटेच्या वेळी कल्यानहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी आणि सीएसएमटीवरुन कल्याणच्या दिशेने येणारी अशा दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. (हेही वाचा, )

रेल्वेगाड्या थांबल्या, प्रवासी अडकले

मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान अनेक गाड्या थांबवण्यात आल्या, ज्यामुळे कल्याण, कसारा आणि कर्जत यासारख्या प्रमुख स्थानकांवर गर्दी झाली. कसारा, आसनगाव आणि टिटवाला येथील प्लॅटफॉर्मवर लोकल गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे विलंब आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले. वीजपुरवठा खंडित झाल्याने एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम झाला, ज्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा विलंब वाढला. अप आणि डाऊन हे दोन्ही मार्ग दीर्घ कालावधीसाठी बंद राहिल्याने बाधित स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली.

प्रवाशांचे हाल

सकाळच्या प्रवाशांनी विलंबाबद्दल निराशा व्यक्त केली. पण, रेल्वे प्रशासनाला फलाटावर उभा राहून लाखोली वाहिली. अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या दैनंदिन वेळापत्रकात व्यत्यय आला. अचानक उद्भवलेली ही परिस्थिती मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्याचे अखंडित वीजपुरवठ्यावरचे अवलंबित्व आणि तांत्रिक त्रुटींचे व्यापक परिणाम दर्शवत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. दरम्यान, रेल्वे अधिकारी या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहेत, परंतु सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी अद्याप कोणतीही अधिकृत कालमर्यादा जाहीर केल्याचे समजू शकले नाही.

लोकल ट्रेन ही मुंबईची नस म्हणून ओळखली जाते. मुंबई शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी कमी वेळात पोहोचण्यासाठी सर्वात जलत आणि कमी खर्चातील इतकेच नव्हे तर वेगवान पर्याय म्हणजे मुंबई लोकल आहे. त्यामुळे बहुतांश मुंबईकर हे रेल्वे वाहतूकीस प्राधन्य देतात. खास करुन सकाळी आणि सायंकाळी मुंबईतील कोणत्याही रेल्वे स्थानकावरील फलाटांवर गर्दी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. अशा वेळी जर रेल्वेचा खोळंबा झाला तर त्याचा प्रचंड त्रास सामान्य मुंबईकरांना होताना दिसतो.