Mumbai Local Mega Block Update: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर 15 ऑक्टोबरला मेगा ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक
हार्बर मार्वावर प्रवास करणार्यांना ब्लॉक दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.
मुंबई लोकलच्या (Mumbai Local) मध्य (Central) आणि पश्चिम रेल्वे मार्गावर (WR) रविवार 15 ऑक्टोबर दिवशी अभियांत्रिकी आणि दुरूस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या ब्लॉकच्या काळामध्ये लोकल उशिराने धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मध्य रेल्वे वर अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावणार आहेत. हार्बर मार्वावर प्रवास करणार्यांना ब्लॉक दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.
रविवारी मध्य रेल्वे मार्गावर दुपारी 1 ते 4 या वेळेत मेगाब्लॉक आहे. या वेळेत ठाणे – कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील गाड्या 15-20 मिनिटं उशिराने धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक हा सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.40 पर्यंत असणार आहे. सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सकाळी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी लोकल रद्द असेल. सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव आणि १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत गोरेगाव/वांद्रे ते सीएसएमटी वाजेपर्यंत लोकल रद्द केल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा धावतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा ब्लॉक असल्याने सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील. तसेच काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.