Mumbai Local Mega Block On August 23: मध्य रेल्वेचा रविवारी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यानच्या अप आणि डाऊन स्लो लाईनवर ब्लॉक असणार आहे तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यानच्या अप आणि डाऊन लाईनवर गाड्या बंद असतील.

Mumbai Local Mega Block

मध्य रेल्वेने रविवार, २३ ऑगस्ट रोजी मुख्य आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवांसाठी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून, यामुळे अनेक लोकल सेवा प्रभावित होणार आहेत. प्रवाशांनी आपला प्रवास त्यानुसार नियोजित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावेळेस ट्रान्स हार्बर, उरण लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक नसल्याने तेथील सेवा सुरळीत चालू राहणार आहेत.

मुख्य मार्गावरील ब्लॉकचे वेळापत्रक

मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यानच्या अप आणि डाऊन स्लो लाईनवर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत ब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान फास्ट लाईनवरून वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहारनंतर पुन्हा स्लो लाईनवर येतील. त्याचप्रमाणे घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप स्लो सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप फास्ट लाईनवरून धावतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.

हार्बर मार्गावरील सेवांवर परिणाम

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यानच्या अप आणि डाऊन लाईनवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यानच्या हार्बर सेवा पूर्णपणे बंद राहतील. त्याऐवजी सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांना या वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

दिवा स्थानकाजवळ तीन रात्री विशेष ब्लॉक

 कल्याण टोकावरील पादचारी पुलाच्या (एफओबी) बांधकामासाठी मध्य रेल्वेने दिवा स्थानकाजवळ तीन सलग रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.हा ब्लॉक २१-२२, २२-२३ आणि २३-२४ ऑगस्ट या रात्री रात्री १.२० ते ३.२० या दोन तासांच्या कालावधीत कळवा आणि डोंबिवली दरम्यानच्या अप आणि डाऊन स्लो लाईनवर घेतला जाणार आहे.  हे काम दिवा स्थानकाजवळील किमी ४२/१२८-१३० येथे कल्याण एंड एफओबीच्या बांधकामाशी संबंधित आहे. या कालावधीत सीएसएमटीहून रात्री १२.०८ वाजता कसाऱ्यासाठी आणि रात्री १२.१२ वाजता कर्जतसाठी सुटणाऱ्या गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन फास्ट लाईनवरून वळवल्या जातील, त्यामुळे या गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement