Mumbai Water: मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळणार? पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील जलसाठ्यात वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये काल 7.26 टक्के पाणीसाठा होता. तर 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानंतर हाच पाणीसाठा 8.94 टक्के झाला आहे.

Koyna Dam | (File Image)

मुंबई (Mumbai Rain) आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर हा कायम आहे. या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या धरणांच्या (Dam) पाणीसाठ्यात देखील चांगलीच वाढ झाली आहे. 24 तासात 1.68 टक्के पाण्याची वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये काल 7.26 टक्के पाणीसाठा होता. तर 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानंतर हाच पाणीसाठा 8.94 टक्के झाला आहे.  (हेही वाचा -Mumbai: मुंबईत झाड कोसळून झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू)

मुंबई शहराला सात धरणामधून पाणी पुरवठा हा होत आहे. मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे 7 धरण आणि भातसा धरणातील शिल्लक पाणीसाठा मिळून मागील 24 तासात 12.57 टक्क्यांहून वाढून 14.61 टक्के झाला आहे. म्हणजे एकूण पाणीसाठ्यामध्ये जवळपास 2.04 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तुळसी आणि विहार धरणामध्ये मागील 24 तासात सर्वाधिक पाणीसाठ्यात वाढ झालेली पहायला मिळत आहे.  मागील 24 तासात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात मोडक सागरमध्ये 3.1%, तानसा धरणात 3.11%, मध्य वैतरणा धरणात 2.65, भातसा धरणात 1.02%, विहार तलावात 4.61% आणि तुळसी धरणात 7.18 % वाढ झाली आहे.

मुंबई महापालिकेने 1 जुलैपासून 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र धरण क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दिवसांमध्ये अशाच पद्धतीने धरण क्षेत्रात पाऊस पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन या निर्णयासंदर्भात फेरविचार करू शकते. मात्र सध्या तरी 1 जुलैपासून मुंबईमध्ये पाणीकपातीचा निर्णय लागू करण्यात आला आहे.