Mumbai Crime: 'मनी हाईस्ट'ने प्रेरित होऊन ICICI बँकेत कोट्यावधी रुपयांची चोरी; वेश बदलून फिरणाऱ्या आरोपीला अडीच महिन्यानंतर अटक
त्यानंतर तपास पथकाला याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर शेख फरार झाला. आपली ओळख लपवण्यासाठी तो त्याच्या दिसण्यात व पेहरावात बदल करत असे.
महाराष्ट्रातील ठाण्यातील मानपाडा येथील आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) 12.20 कोटी रुपयांची चोरी करणाऱ्या अल्ताफ शेख (43) याला पोलिसांनी अडीच महिन्यांनंतर पुण्यातून अटक केली आहे. शेख हा बँकेतील लॉकरचा रखवालदार म्हणून काम करायचा. वर्षभर नियोजन करून त्याने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये ही चोरी केली. या चोरीसाठी तो 'मनी हाईस्ट'ने प्रेरित झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत शेखची बहीण निलोफरसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चोरी केल्यानंतर अल्ताफने वेश बदलून बुरखा परिधान केला होता व तो बुरख्यामध्येच वावरत होता. चोरीचे काही पैसेही त्याने बहिण निलोफरकडे लपवून ठेवले होते. चोरीच्या या घटनेबाबत त्याची बहीण निलोफर हिला सर्व माहिती होती. पोलिसांनी शेखकडून नऊ कोटी रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी शेखला सोमवारी (3 ऑक्टोबर 2022) अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये त्याच्या बहिणीचाही समावेश आहे.
बँक चोरीची घटना 12 जुलै 2022 रोजी घडली. मुंबईतील मुंब्रा येथे राहणारा शेख हा कस्टोडियन म्हणून बँकेच्या लॉकरच्या चाव्या सांभाळत असे. शेखने बँकेवर दरोडा टाकण्यापूर्वी वर्षभर तेथील यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवले आणि त्यातील त्रुटी जाणून घेतल्या. यादरम्यान त्याने एक प्लॅन करून चोरीची घटना घडवून आणली. यासाठी त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही छेडछाड केली.
तपासादरम्यान शेखने सर्वात प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी छेडछाड केल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्याने बँकेची अलार्म यंत्रणा निष्क्रिय केली. त्यानंतर लॉकरमधून रोख रक्कम बाहेर घेऊन जाण्यासाठी त्याने एसी डक्ट रुंद केले आणि रोख रक्कम कचरा डंप पाईपपर्यंत हलवली. शाखेत ठेवलेली रोकड कमी असल्याने त्वरित बँक अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. (हेही वाचा: Cyber Crime: वीज बिल भरण्याच्या बहाण्याने सेवानिवृत्त शिक्षकाची 2.46 लाखांची फसवणूक)
यानंतर बँक अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही तपासले असता डीव्हीआर गायब असल्याचे आढळून आले. त्यानंतर तपास पथकाला याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर शेख फरार झाला. आपली ओळख लपवण्यासाठी तो त्याच्या दिसण्यात व पेहरावात बदल करत असे. तो बुरखा घालायचा. बँकेतून चोरीला गेलेल्या 12.20 कोटी रुपयांपैकी केवळ 9 कोटी रुपयेच परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित रक्कम लवकरच वसूल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.