गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना MSRTC कडून गोड बातमी; 5220 जादा गाड्या, आरक्षण, ग्रुप बुकिंगची घोषणा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ५,२२० जादा बसगाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. ७ ऑगस्ट रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना MSRTC कडून गोड बातमी; 5220 जादा गाड्या, आरक्षण, ग्रुप बुकिंगची घोषणा
ST Bus | (Photo credit: archived, edited, representative image)

गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने (ST) मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ तब्बल 5220 जादा बसगाड्या सोडणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. कोकणवासीय मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येतात. चाकरमनींना या गणेशोत्सवासाठी प्रवास करण्याकरिता मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातून  ७ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

कधीपासून धावणार गणेशोत्सव विशेष जादा गाड्या?

यंदा गणेशोत्सवात गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ७ सप्टेंबरपासून जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्या २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, मुंबई, ठाणे आणि पालघर विभागांतील प्रमुख बसस्थानकांवरून त्या सोडल्या जाणार आहेत.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, नफा-तोटा न पाहता प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देण्यास महामंडळ कटिबद्ध आहे. कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाला विशेष भावनिक महत्त्व असून, गणपती बाप्पा, कोकणवासीय आणि एसटी यांच्यातील नाते घट्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आरक्षण आणि ग्रुप बुकिंगची सुविधा

जादा बसगाड्यांचे आरक्षण एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच एसटी बस रिझर्वेशन मोबाईल ॲपद्वारे करता येणार आहे. याशिवाय प्रवाशांना बसस्थानकांवर जाऊनही तिकीट आरक्षित करता येईल.

किमान ४० प्रवाशांचा समूह असल्यास १० ऑगस्टपासून ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेअंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे, तर अमृत योजनेअंतर्गत नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत मिळणार आहे.

प्रवासादरम्यान अतिरिक्त सुविधा

गणेशोत्सव काळात प्रवास सुरळीत व्हावा यासाठी प्रमुख बसस्थानके आणि थांब्यांवर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी चोवीस तास तैनात राहणार आहेत. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर वाहन दुरुस्ती पथकेही सज्ज ठेवली जाणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना तातडीने मदत मिळू शकेल आणि प्रवास विनाअडथळा पार पडेल. नक्की वाचा: CSMT- Sawantwadi Road Daily Express Train: सीएसएमटी-सावंतवाडी रोड स्थानका दरम्यान रोज धावणार नवी एक्सप्रेस; पहा थांबे .

आषाढी एकादशीच्या अनुभवावरून वाढवली संख्या

नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने सुमारे ५,२०० जादा बसगाड्या सोडल्या होत्या, ज्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. याच अनुभवाच्या आधारे गणेशोत्सवासाठीही तितक्याच मोठ्या प्रमाणात मागणी राहील, असा अंदाज महामंडळाने व्यक्त केला असून त्यानुसार यंदाचे नियोजन करण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2026 02:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).