MSRTC Strike: एसटी कर्मचाऱ्यांबाबत मोठ्या घोषणेची शक्यता, परिवहन मंत्री अनिल परब यांची सायंकाळी पत्रकार परिषद

संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात आज (24 नोव्हेंबर) एक बैठक पार पडली. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

MSRTC | (Photo Credits: msrtc)

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (MSRTC Strike) तोडगा निघण्याची शक्यता आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात आज (24 नोव्हेंबर) एक बैठक पार पडली. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाल्याची प्रतामिक माहिती आहे. या चर्चेनंतर परिवहन मंत्री अनिल परब अजित पवार यांच्या भेटीसाठी प्रस्ताव घेऊन अर्थमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, अनिल परब हे आज सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांबाबत काही महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्री यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चा सकारात्मक झाल्यामुळे संपावर तोडगा निघेल अशी चर्चा आहे. शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाडीच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे समजते. सरकारने कर्मचाऱ्यांसमोर कालच पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. यावर एसटी कर्मचाऱ्यांनी विचारविनिमय करुन अनिल परब यांच्यासोबत आज पुन्हा बैठक घेतली. (हेही वाचा, ST Worker Strike: राज्यात परिवहन कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र, जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनिल परबांच्या घरावर फेकली शाई)

एसटी कर्मचाऱ्याचे वेतन किमान 5000 तर कमाल 21000 करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. अद्यापही काही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. काही कर्मचाऱ्यांची भूमिका आहे की, पगारवाढ ही आमची मागणीच नाही. आमची मागणी ही विलिनीकरण हीच आहे. सरकारने ती पूर्ण करावी. पाठिमागील 15 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत एसटी कर्माचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. आता राज्य सरकार या संपावर काय तोडगा काढते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.