MSRTC: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जून 2025 पासून मिळणार 53% महागाई भत्ता, 1 कोटी रुपयांचा अपघात विमा आणि वर्षभराचा मोफत प्रवास पास
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
राज्यातील सर्व एस. टी. कर्मचारी संघटनांची विविध प्रश्नाबाबतची बैठक, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपू्र्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून 2025 पासून 46 टक्के ऐवजी 53 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी 12 महिन्यासाठी देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्या सोबतच बसस्थानके देखील स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छतागृह, विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजेत असे सांगत एसटी अधिक फायद्यात राहण्यासंदर्भात अभ्यास करा. एसटीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे शिंदे यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही पैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. (हेही वाचा; Maharashtra Cabinet Decisions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळा बैठक; घेतले अनेक महत्वाचे निर्णय)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहेत अशा कर्मचाऱ्यांना कामगिरीवर असताना किंवा नसताना (दोन्ही प्रकरणी) अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास एक कोटी, पुर्णतः अपंगत्व आल्यास एक कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास 80 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाईल. एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्याची घोषणा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. याचा लाभ सुमारे 35 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 08:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

