सीएम उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' विधानाबाबत MP Sanjay Raut यांचे स्पष्टीकरण- 'योगींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला होता'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना थप्पड मारल्याबाबत भाष्य केल्याने, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली.

Shiv Sena MP Sanjay Raut | (File Photo)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणाऱ्या घटना घडत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना थप्पड मारल्याबाबत भाष्य केल्याने, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली. राणे यांना सध्या तरी या प्रकरणात दिलासा मिळाला असला तरी, घडल्या प्रकरणामुळे भाजप (BJP) सातत्याने शिवसेनेवर (Shiv Sena) हल्ला करत आहे. आता भाजपच्या एका नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या  तीन वर्षांपूर्वीच्या एका वक्तव्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चपलेने मारले पाहिजे.

भाजपने या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या प्रकरण चिघळत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काही विधान केले ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाबाबत होते. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना चप्पल घालून हार घातला जात नाही. ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमची संस्कृती आणि परंपरेचा अपमान केला होता.’

25 ऑक्टोबर 2020 रोजी दसरा मेळाव्याच्या भाषणादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात अपशब्द वापरले. भाषणादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘योगी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री कसा बनू शकतो. योगी असेल तर त्याने जाऊन एका गुहेत बसावे. तो चप्पल घालून महाराजांना हार घालायला गेला होता. असे वाटले की त्याच चपलांनी त्याचे थोबाड फोडावे. लायकी तरी आहे तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाण्याची.’ (हेही वाचा: Shiv Sena on BJP: भाजपने आता तरी शहाणे व्हावे, शिवसेनेचा सल्ला)

आता भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची आणि दाहक भाषणे केल्याबद्दल कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारदाराने म्हटले आहे की, ज्या प्रकारे ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द वापरले, त्यानंतर समाजात अशांतता आणि दंगली होऊ शकल्या असत्या.