Coronavirus Cases in Mumbai: मुंबईत मागील 24 तासांत आढळले 800 हून अधिक कोरोनाचे रुग्ण
तसेच आज दिवसभरात 5 नवे कोरोनाचे रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा 11,435 वर पोहोचला आहे.
Coronavirus Update in Mumbai: महाराष्ट्रासह मुंबईत देखील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील 24 तासांत मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही 800 च्या पार गेली आहे. मुंबईत (Mumbai) 823 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,17,310 इतकी झाली आहे. तसेच आज दिवसभरात 5 नवे कोरोनाचे रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा 11,435 वर पोहोचला आहे. सद्य घडीला मुंबईत 6577 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 2,98,435 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
मुंबईत कोरोना वाढीचा दर 0.18% इतके झाला आहे. मुंबईत कोरोनाची परिस्थिती पाहता संबंधित प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत आणि पुन्हा नवे निर्बंध लागू केले आहेत. याचपार्श्वभूमीवर घरी विलगीकरण राहणाऱ्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारावेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Singh Chahal) म्हणाले होते. मात्र,आता लक्षण विरहित लोकांनासुद्धा होम क्वारंटाइन करणार नाही. प्रत्येकाला कोव्हिड सेंटरमध्येच जावे लागणार आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्पष्ट केले आहे.हेदेखील वाचा- BMC New Covid-19 Guidelines: मुंबईत एखाद्या इमारतीत 5 हून अधिक कोविड रुग्ण आढळल्यास संपूर्ण बिल्डींग सील होणार- आयुक्त इक्बाल चहल
मुंबईत कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात मुंबई महानगरपालिकेने देखील नवी नियमावली तयार केली आहे. यात मनपा आयुक्त इक्बाल चहल यांनी घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारावेत, त्यांनी नियम मोडला तर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे म्हटले आहे. तसेच एखाद्या इमारतीत 5 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यास संपूर्ण बिल्डिंग सील केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.