Monuments in Maharashtra: महाराष्ट्रात मंदिरे उघडली, आता स्मारके कधी सुरु होणार? पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरेंनी दिले 'हे' उत्तर

त्यानंतर आता राज्यात पर्यटकांसाठी स्मारके (Monuments) उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Ajanta Ellora Caves To Be Developed As World Class Sites (Photo Credits: Instagram)

लॉक डाऊनमध्ये (Lockdown) शिथिलता आणत तब्बल 8 महिन्यांनंतर महाराष्ट्रात आता उद्यापासून मंदिरे (Temples) उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर आता राज्यात पर्यटकांसाठी स्मारके (Monuments) उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, पर्यटन राज्यमंत्री  (Minister of State for Tourism) आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी रविवारी सांगितले की, पर्यटकांसाठी स्मारक पुन्हा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. कोरोना विषाणू व लॉक डाऊनमुळे महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा आणि एलोरा लेण्यांसह (Ajanta and Ellora Cave) अन्य स्मारके बंद आहेत. ही स्मारके पुन्हा उघडली पाहिजेत, अशी मागणी औरंगाबादमधील पर्यटक मार्गदर्शक संघटनेने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

महाराष्ट्रातील स्मारके बंद असल्याने पर्यटन व्यवसाय थंडावला आहे. अशात अनेकांवर उपासमारीची वेळ आहे. याच पार्श्वभूमीवर ही स्मारके उघडण्यात यावीत अशी मागणी होत आहे. याबाबत वृत्तसंस्था पीटीआयला माहिती देताना तटकरे यांनी सांगितले, ‘हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याने मला याबद्दल काहीही सांगता येणार नाही, मात्र पर्यटन स्थळ सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.’ औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, पर्यटनावर ज्यांची रोजीरोटी अवलंबून आहे, अशा अनेकांना मी भेटलो असून हे लोक अडचणीत आहेत.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे औरंगाबाद परिमंडळ या विषयावर राज्य सरकारला पत्र लिहिण्याची योजना आखत आहे. याबाबत ते म्हणाले, ’आम्ही स्मारके पुन्हा सुरू करण्यासाठी तयार आहोत मात्र यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. आमचे कार्यालय लवकरच राज्य सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहे.’ दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील मंदिरे, प्रार्थना स्थळे उघडण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मंदिरांच्या ट्रस्टनी दर्शनसाठी काही विशेष नियम घालून दिले आहेत. दर्शन घेताना कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे.