Monsoon 2024: केरळनंतर तामिळनाडूत मान्सूनची एंट्री; पहा महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

कोझिकोडच्या उरुमीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. तेथे 14 सेमी पावसाची नोंद झाली.

Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

उत्तर भारतात सध्या तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे, असं असताना दक्षिण भारतात मात्र मान्सूनची चाहूल लागली (Monsoon News) आहे. केरळमध्ये (Kerala) दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केरळमध्ये 30 मे रोजीच मान्सून धडकला. साधारणपणे 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो, पण यंदा मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून 15 जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतो. 20 जूनपर्यंत मान्सून उत्तर प्रदेशात पोहोचेल. केरळनंतर मान्सून तामिळनाडूत दाखल झाला आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा जोर वाढला आहे. मान्सूनमुळे केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.  (हेही वाचा -  Mumbai: पावसाळ्यात झाडे पडणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी, खड्डे इ. समस्यांसाठी मिळणार त्वरीत मदत; MMRDA ने स्थापन केला नियंत्रण कक्ष, जाणून घ्या संपर्क क्रमांक)

पुढील 24 तासांत केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोझिकोडच्या उरुमीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. तेथे 14 सेमी पावसाची नोंद झाली. मान्सून सध्या पूर्वोत्तर दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आतापर्यंत ते अंदमान-निकोबार बेटे, केरळ, लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्ये मान्सून पोहोचला आहे. मान्सून कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात 5 जूनला पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहोचेल.

1 आणि 2 जून 2024 रोजी केरळ आणि माहेमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 2 आणि 3 जून 2024 रोजी अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, तर काही भागात अति अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.