कोल्हापूर, सांगलीसह सातारा येथे मुसळधार पावसाची शक्यता, 48 तासांचा रेड अलर्ट जारी; मदतीचा ओघ सुरू

मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 48 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

एक आठवडापेक्षा जास्त दिवस सतत पडत असलेल्या पावसाचा तडाखा कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना चांगलाच बसला आहे. सांगलीमध्ये पुराने 2005 सालचा रेकॉर्ड मोडला आहे. कोल्हापुरात पंचगंगा अशी कोपली आहे की तिने पाहताक्षणीच शहराचा समुद्र बनवून टाकला. ही पूरपरिस्थिती गंभीर बनली असून अजूनही अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये हजारो लोक या पाण्यात अडकले आहेत. सध्या त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणजे पंचगंगेची पातळी 2 फुटांनी कमी झाली आहे. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 48 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 239 गावांमधून, 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सध्या पंचगंगेची पातळी 53.5 इतकी झाली आहे, मात्र अजूनही ढोल टळला नाही. पाण्याची पातळी अजून थोडी कमी झाल्यावर अनेक गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु होणार आहे. पूरग्रस्त गावांमध्ये मदत करताना इंधन कमी पडू नये म्हणून पेट्रोलियम कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. 69 हजार लिटर पेट्रोल, 31 हजार लीटर डिझेलचा राखीव साठा पूरग्रस्तांसाठी वापरला जात आहे. (हेही वाचा: पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा; दोन हजारांहून अधिक मालट्रक, अन्य अवजड वाहने अडकली)

पाणीपुरवठा, वीज पुरवठा, मोबाईल नेटवर्क, एलपीजी सिलिंडर अशा सर्व गोष्टींबाबत सूचना गेल्या आहेत. लवकरच या सेवा पूर्वपदावर येतील. दुसरीकडे कोयना-कृष्णेच्या काठावरील पाटण, कराड, वाई, सांगली या शहरांतील पूरस्थिती जैसे थे अशीच आहे. कोयना जलग्रहण क्षेत्रात परत पावसाला सुरुवात झाल्याने कोयनेची पातळी तासाचा अडीच इंच याप्रमाणे वाढत आहे. त्यामुळे कोयना धरणातील विसर्गही वाढवावा लागणार आहे. मुसळधार पडलेल्या पावसाने आपला जोर कमी केला नाही तर मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे.