वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जामीन मंजूर

याप्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी असणार आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

वाशी टोलनाका (Vashi Toll Naka) तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी असणार आहे. दरम्यान, जानेवारी 2014 मध्ये झालेल्या टोकनाका तोडफोड प्रकरणावरुन बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करत 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार राज ठाकरे आज सकाळी न्यायालयात हजर झाले. त्यावेळी त्यांच्या सोबत मुलगा अमित ठाकरे, मनसे नेते अविनाश जाधव, गजानन काळे उपस्थित होते. तसंच कोर्टाबाहेर  मनसे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

कोर्टात राज ठाकरे यांनी दोन अर्ज दाखल केले. एक जामीन अर्ज आणि दुसरा पुढील सुनावणीसाठी अनुपस्थिती राहण्याची अनुमती देणारा अर्ज. त्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली आणि अवघ्या काही वेळात राज ठाकरे यांना जामिन मंजूर झाला. तसंच पुढील सुनावणीसाठी उपस्थित न राहण्याचीही अनुमती मिळाली आहे. दरम्यान, राज ठाकरे न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर ते नवी मुंबईतील पक्ष कार्यालायला भेट देणार होते. त्यानंतर ठाण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची देखील भेट घेणार आहेत. (वाशी टोल नाक्याच्या तोडफोड प्रकरणी आज राज ठाकरे कोर्टात हजर राहणार, नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी)

काय आहे प्रकरण?

26 जानेवारी 2014 रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी टोकनाक्यांच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते, तसंच टोलनाक्यांची प्रक्रीया पारदर्शक होत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांनी टोल भरु नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यांच्या या भाषणानंतर वाशी येथील टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापूर्वी पोलिसांच्या नोटीसी, समन्सला उत्तरे न दिलेल्या राज ठाकरेंविरोधात कोर्टानं अखेर वॉरंट जारी केलं. त्यानंतर आज राज ठाकरेंनी न्यायालयात हजेरी लावली.