पंतप्रधानांना गुजरात आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई पुढे काही दिसत नाही; मनसेची टीका

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकत्रितपणे निशाणा साधला आहे.

PM Narendra Modi, Sandeep Deshpande & CM Uddhav Thackeray (Photo Credits: PTI/Twitter/ANI)

अवघ्या दोन दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना जोरदार तडाखा दिला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरात (Gujarat) दौरा करुन तिथे झालेल्या नुकसानाची पाहाणी केली. तसंच गुजरातसाठी विशेष आर्थिक पॅकेजही जाहीर केलं. मात्र ते महाराष्ट्रात फिरकले नाहीत किंवा अद्याप कोणतीही मदत त्यांनी जाहीर केलेली नाही. कोरोना व्हायरस संकटातही आरोग्य सुविधा, मदत पुरवण्यात महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान, कोविड-19 संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) मुंबईचा सर्वाधिक विचार करत असून इतर जिल्ह्यांकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा सूर वारंवार विरोधकांकडून लागवण्यात आला आहे. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यावर एकत्रितपणे निशाणा साधला आहे.

पंतप्रधानांना गुजरात आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई पुढे काही दिसत नसल्याची टीका त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केली आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही." (केंद्र आणि राज्याच्या blame game मध्ये जनतेचाच game होतोय- मनसे नेते संदीप देशपांडे)

संदीप देशपांडे ट्विट:

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या याच वागणुकीमुळे महाराष्ट्रातील जनतेला दोघांमध्ये आपले भविष्य दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. थेट आणि स्पष्ट शब्दांत टीका करणे ही मनसेची शैली आहे. यापूर्वी देखील अनेक मुद्द्यांवरुन मनसेने मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांवर देखील टीका केली आहे.