'ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलत त्याच हातांनी सलाम कराल'; मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला संताप (Watch Video)

एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या मनसैनिकांवर हात उचलेल्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. पहा अजून काय म्हणाले मनसे नेते?

Sandeep Deshpande (Photo Credits: Facebook)

वसईत परिवहन सेवेच्या उद्धाटनासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मनसे सैनिकांनी गोंधळ घातला. घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढताना मारहाण केली. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी संताप व्यक्त केला आहे. यासाठी संदीप देशपांडे यांनी व्हिडिओ शेअर करत पोलिसांना आव्हान दिले आहे. त्याचबरोबर मारहाण करणाऱ्या पोलिसांनी निलंबित करण्याची मागणी केली आहे.

संदीप देशपांडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले की, "वसई-विरार येथे एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात आयुक्त साहेब वेळ द्या असं म्हणत आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर पोलिसांनी हात उचलला. पोलिस त्यांना आई-बहीणीवरुन शिव्या देत होते. त्या पोलिसांना मला एकच सांगायचं आहे, आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या आई-बहीणी रस्त्यावर पडलेल्या नाहीत. सरकारचे दलाल असल्यासारखं काम करु नका. सत्ता येते, सत्ता जाते. पण पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे."

तसंच मनसे जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्या मनसैनिकांच्या कानाखाली मारण्याचीही गरज नव्हती. इतका माज दाखवू नका आणि इतकी सत्तेची दलाली करु नका. इतकंच जर असले तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा. आणि मग आम्ही दाखवतो राज साहेबांचे कट्टर सैनिक काय आहोत.

पहा व्हिडिओ:

"जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा आम्हीच तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज साहेबांची शिकवण आहे म्हणून आम्ही हे सहन करतोय. याचा अर्थ असा नाही की, आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करु," असं म्हणत त्यांनी पोलिसांना त्यांच्यासाठी काढलेल्या मोर्च्याची देखील आठवण करुन दिली. (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याला मनसेचा विरोध; 'या' नेत्याचे नाव देण्याची मागणी)

मनसैनिकांवर हात उचलेल्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी देखील संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्याचबरोबर ज्या हातांनी मारलं ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलत त्याच हातांनी सलाम कराल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement