Raj Thackeray Birthday: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज वाढदिवस साजरा करणार नाहीत; मनसैनिकांना पत्रातुन केले 'हे' आवाहन

याबाबत,राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून समस्त मनसैनिकांना आवाहन करणारे पत्र लिहिले होते.

Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus In Maharashtra) निर्माण झालेल्या या संकटकाळात आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शुक्रवारीच सुनावला होता. आज, रविवार, 14 जून रोजी राज यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त राज यांच्या निवास्थानी म्हणजेच कृष्णकुंजवर अगदी घरगुती सेलिब्रेशन होण्याची शक्यता आहे. मात्र मनसैनिकाने प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असे राज यांनी स्पष्ट सांगितले आहे. यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून समस्त मनसैनिकांना आवाहन करणारे पत्र लिहिले होते. "तुमचा जीव जपा, कुटुंबाची काळजी घ्या, तुमच्या जीवापेक्षा मोलाचे काहीच नाही,  या संकटकाळात एखाद्या गरजूला मदत करा तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहचतील", असे राज यांनी पत्रातून म्हंटले आहे.

राज ठाकरे यांचे मनसैनिकांना पत्र

"14 तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण ह्या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही आणि म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत.बाकी महाराष्ट्रातील जनतेसाठी तुमचं सुरु असलेलं मदतकार्य नक्की चालू ठेवा पण हे करताना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जीवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही.सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेंव्हा तुमच्याशी भेट होईलच".

राज ठाकरे पोस्ट

दरम्यान, प्रत्यक्ष नसल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर अनेकांनी आज शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राजकीय नेत्यांपासून ते सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासदांनी राज यांच्या खास दिवशी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.