राज्यातील इतर प्रमुख पक्षांचे आमदार शिवसेनेच्या संपर्कात; खा. संजय राऊत यांचा भाजपला टोला
आंबेडकर-ओवेसी युती म्हणजे भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
'जे शिवसेनेचे आमदार फोडायला निघाले होते, त्यांचेच आमदार त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे इतरांचे आमदार फडणाऱ्या भाजपच्या गोटात अस्वस्थता असल्याचा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. दरम्यान, इतर प्रमुख पक्षातील नेते आणि आमदारही शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा दावाही राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेतील काही आमदार गळाला लागल्याचे बोलले जात आहे. पण, शिवसेनेला कधीच तडा जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अभंग आहे. ज्यांनी शिवसेनेचे आमदार फुटणार असल्याच्या पुड्या सोडल्या त्यांच्याच पक्षाचे आमदार त्यांना सोडून जात आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील अस्वस्थता वाढली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. 'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तात राऊत यांनी हा दावा केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, इतर प्रमुख पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. योग्य वेळ आली की, तुम्हाला त्यांची माहिती मिळेल. यातील बरीच नावे मोठी आहेत, असेही राऊत यांनी म्हटले आहे. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रसारमाध्यमांसोबत राऊत बोलत होते.
दरम्यान, राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाच्या युतीवर टीका केली. आंबेडकर-ओवेसी युती म्हणजे भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप राऊत यांनी केला.