MLA Ganpat Gaikwad Statement On Thane Shootout: भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले 'होय, मी गोळीबार केला', कारणही सांगितले, घ्या जाणून
त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत प्रसमारमाध्यांशी बोलताना सांगितले. आपण मनस्तापातून हे पाऊल उचलले असून त्याला जबाबदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचेही ते त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाणे शहरातील राजकारणात वेगळी खळबळ उडाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील (Thane News) कल्याण तालुक्यात असलेल्या उल्हासनगर (Ulhasnagar) येथे पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदाराने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) असे या आमदाराचे नाव आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हा गोळीबार नेमका का केला? याबाबत स्वत: गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad Statement On Thane Shootout) यांनीच माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये, 'होय, आपण गोळीबार केला. मनस्तापातून आपण हे कृत्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारी पसरवण्याचे आणि गुन्हेगारांना पोसण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या चांगल्या माणसांना हे कृत्य करावे लागले', असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.
जमीनिच्या वादातून गोळीबार
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 50 गुंठे जमीनीचा तुकडा हाच या वादाचे प्रमुख कारण असल्याचे पुढे आले आहे. या जमीनीवरुन आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यात वाद होता. काही वादातून दोन्ही गट उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. या वेळी हा गोळीबार घडला. (हेही वाचा, Thane BJP MLA Shootout Case: 'महाराष्ट्रात गँगवॉर, भाजपला सत्तेची मस्ती', आमदार गोळीबार प्रकरणावरुन सुप्रिया सुळे आक्रमक)
प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार गणपत गायकवाड काय म्हणाले?
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलता सांगितले की, 'होय, मी गोळीबार केला. मनस्तापातून हे कृत्य मी केले. त्यांनी (महेश गायकवाड) पोलीस स्टेशनमध्येच माझ्या मुलाला मारहाण केली. मुलाला मारहाण होत असताना मी स्वस्त बसू शकत नाही. त्यांनी माझ्या जागेचा जबरदस्तीने ताबा घेतला. हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरदहस्ताने होत आहे. याबाबत मी वरिष्ठांनाही वेळोवेळी कल्पना दिली आहे. शिंदे हे राज्यात गुन्हेगारी पसरविण्याचे काम करत आहेत. शिंदेसारखे मुख्यमंत्री जर महाराष्ट्राला लाभले तर राजयात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या लोकांनाही शिंदे यांनी गुन्हेगार केले. माझा मनस्ताप झाला म्हणूनच मी फायरींग केले. त्याला जीवे मारण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. पण, माझा मनस्ताप वाढला होता', असे स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी दिले आहे. माझ्या डोळ्यासमोर मुलाला मारहाण होत असेल तर मी पाहात कसे राहणार? असेही गायकवाड यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Kalyan Firing: माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार, उल्हासनगरमध्ये खळबळ)
दरम्यान, पोलिसांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. प्रकरणाची वरीष्ट पातळीवर चौकशी केली जाणार आहे. या गुन्ह्याच्या तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. तसेच, आरोपींना आज दुपारनंतर कोर्टासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.