पुणे येथील तरुण छत्तीसगढ राज्यात माओवादी कमांडर; भवानीपेठ कासेवाडी येथून नऊ वर्षांपूर्वी झाला होता बेपत्ता
तो पुणे येथील भवानी पेठ (Bhawani Peth) परिसरातील कासेवाडी (Kasewadi) येथे राहात होता. नऊ वर्षांपूर्वीच तो घरातून बेपत्ता झाला होता. तेव्हापासून त्याचा काहीच ठावठिकाणा नव्हता
धत्तीसगढ (Chhattisgarh) पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी तयार केली आहे. या यादीत महाराष्ट्राच्या तरुणाचेही नाव आहे. विशेष म्हणजे हा तरुण राज्यातील माओवादबहुल जिल्ह्यातील नव्हे तर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील आहे. संतोष वसंत शेलार (Santosh Vasant Shelar) उर्फ विश्वा असे या तरुणाचे नाव आहे. तो पुणे येथील भवानी पेठ (Bhawani Peth) परिसरातील कासेवाडी (Kasewadi) येथे राहात होता. नऊ वर्षांपूर्वीच तो घरातून बेपत्ता झाला होता. तेव्हापासून त्याचा काहीच ठावठिकाणा नव्हता.
प्राप्त माहितीनुसार, संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा नामक तरुण हा माओवादी गटाचा डेप्युटी कमांडर आहे. त्याच्याकडे रांजनांदगाव तांडा एरिया कमिटी डेप्युटी कमांडरपद आहे. छत्तीसगढ पोलिसांनी तयार केलेल्या माओवाद्यांच्या यादीत संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा डेप्युटी कमांडर अशीच ओळख दिली आहे.
संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा हा पुण्यात राहात होता. साधारण नोव्हेंबर 2010 मध्ये तो बेपत्ता झाला. त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेतला. पण, त्याचा काहीच पत्ता लागला नाही. परिणामी जानेवारी 2011 मध्ये त्याच्या घरातल्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. या घटनेला आता बरीच वर्षे उलठून गेली. त्यामुळे तसा तो विस्मरणातच गेला होता. परंतु, छत्तीसगढ पोलिसांच्या यादीमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (हेही वाचा, गडचिरोली: भुसुरुंग स्फोट प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कैलास रामचंदानी याला अटक)
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, छत्तीसगढ पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. यात रांजनांदगाव आणि परिसरात होत असलेल्या माओवादी कारवायांबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा, महाराष्ट्र, पुणे येथील नागरिक अशी एका तरुणाची ओळख आहे. एकूण 14 जणांच्या यादीत संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा याचे नाव आहे. तसेच, तो पुणे येथून बेपत्ता झाल्याची नोंदही आढळत आहे. त्यामुळे हा तरुण आता माओवादी कमांडर झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे पुढे येत आहे.