MHADA Mumbai Lottery Prices: मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किंमती गगनाला भिडल्या; तारदेव येथे तब्बल 7.58 कोटींना विकला जात आहे फ्लॅट
यासह जनतेचा चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी किमतींचा फेरविचार होईल की नाही यावरही भाष्य केले नाही.
जनतेला परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (MHADA) घरे आता फारशी परवडणारी राहिली नाहीत. सोमवारी जाहीर झालेल्या मुंबईतील युनिट्सची किंमत ही खाजगी विकासकांनी ऑफर केलेल्या 7.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सोमवारी, म्हाडाच्या मुंबई मंडळाने बृहन्मुंबई हद्दीतील विविध ठिकाणी 4083 घरांची विक्री जाहीर केली.
उच्च-उत्पन्न गट (HIG) ब्रॅकेटमध्ये तारदेव येथील क्रेसेंट टॉवर्स येथे 1,532 चौरस फुटांचे अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत जवळपास ₹7.58 कोटी आहे. अशाप्रकारे डाच्या घरांच्या वाढत्या किंमती या ज्यांना मुंबईतील त्याच्या कामाच्या ठिकाणाजवळील उपनगरात स्थलांतरित व्हायचे, त्यांच्यासाठी समस्या ठरत आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे.
याबाबत डोंबिवलीचे रहिवासी एमएच कमल म्हणाले, ‘म्हाडाच्या घरांच्या किंमती खूप जास्त आहेत आणि मला अपेक्षित असलेल्या श्रेणीत अजिबात परवडणारी घरे नाहीत. मी लॉटरी जिंकली तरीही मी त्याचे पैसे कसे भरू शकेन याची मला खात्री नाही.’ अशा उच्च किमतीच्या 'परवडणाऱ्या' घरांमुळे घर खरेदीदार नाराज आहेत. याचे आणखी एक कारण म्हणजे, बाजारातील इतर विकासकांकडून ऑफर केलेल्या तुलनेत म्हाडाचे बांधकाम निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत आहेत.
अंधेरीतील डीएन नगर, पश्चिम येथे कमी-उत्पन्न गटासाठी (LIG) 553 चौरस फुटाच्या फ्लॅटची किंमत 1.61 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. साधारण 6 ते 9 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले अर्जदार यासाठी पात्र आहेत. सकल मासिक उत्पन्न 85,000 असलेला अर्जदार 44 लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी, वार्षिक 8.6 टक्के व्याजदराने या घरासाठी पात्र असेल. याचा अर्थ, मुद्रांक शुल्क, नोंदणी, आगाऊ देखभाल आणि इतर खर्चासाठी साधारण 12 लाख रुपये अतिरिक्त रक्कम खर्च करण्याव्यतिरिक्त, डाऊन पेमेंटसाठी व्यक्तीकडे किमान 1.17 कोटी रुपये असणे आवश्यक आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी (EWS) - वार्षिक 6 लाखांपर्यंत करपात्र कौटुंबिक उत्पन्नासह - वडाळ्यातील अँटॉप हिल येथे एक फ्लॅट 40 लाख रुपयांना विकला जात आहे. अर्जदाराचे निव्वळ वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये असल्यास, ती व्यक्ती केवळ 28.50 लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी पात्र असेल. हे देखील जर त्या व्यक्तीकडे दुचाकी कर्ज, विमा प्रीमियम, क्रेडिट कार्ड ईएमआय यांसारखी इतर कोणतीही कर्जे नसतील तरच. मध्यम-उत्पन्न गट (MIG) अर्जदारांसाठी, JVPD योजनेत 911 चौरस फुटांचे एक अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत 4.72 कोटी आहे. (हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 26 मे रोजी नाशिकमध्ये होणार समृद्धी द्रुतगती मार्गाच्या शिर्डी-भारवीर भागाचे उद्घाटन)
म्हाडाच्या घरांच्या वाढत्या किंमतीबाबत मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मौन बाळगले. यासह जनतेचा चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी किमतींचा फेरविचार होईल की नाही यावरही भाष्य केले नाही. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, मुंबई मंडळाला 4,236 अर्ज प्राप्त झाले, परंतु केवळ 1,700 अर्जांसाठी टोकन रक्कम जमा करण्यात आली. टोकन रक्कम भरल्यावरच अर्ज लॉटरी सोडतीसाठी पात्र ठरू शकतो.