MHADA Konkan Lottery 2023: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घराच्या लॉटरीची प्रतीक्षा संपली; आजपासून करू शकता ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या कागदपत्रांची नावे
अर्ज केल्यानंतर लोकांना किती फ्लॅट उपलब्ध आहेत याचीही माहिती मिळेल. अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदाराला अनामत रक्कम आणि अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) कोकण मंडळाच्या (4,654) घरांची सोडत प्रक्रिया या आठवड्यापासून सुरू झाली. म्हाडाने सोमवारी ठाणे, कल्याण, पालघर, वसई, विरार, सिंधुदुर्ग आदी ठिकाणी कोकण मंडळाच्या तयार घरांची जाहिरात प्रसिद्ध केली व 8 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्जदार 12 एप्रिलपर्यंत लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात. म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारुती मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या 4,654 घरांची लॉटरी 10 मे रोजी निघणार आहे.
कोकण विभागातील या जाहिरातीनंतर मुंबईत स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची प्रतीक्षा वाढली आहे. मुंबईतील म्हाडाच्या घरांची लॉटरी चार वर्षांपूर्वी काढण्यात आली होती. मुंबई मंडळाने सुमारे चार हजार घरे पूर्ण केली आहेत. त्यापैकी सर्वाधिक 2,683 घरे गोरेगावमध्ये आहेत.
या वर्षीपासून म्हाडाने लॉटरी प्रक्रिया 100% ऑनलाइन केली आहे. अर्जदारांची सर्व कागदपत्रे फक्त ऑनलाइन तपासली जातील. अर्जदार मार्चपासून म्हाडाच्या वेबसाइटवर नोंदणी करून लॉटरी प्रक्रियेत सामील होऊ शकतात. लॉटरीत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत अर्जदारांना 21 कागदपत्रे सादर करावी लागत होती. परंतु आता लॉटरी सॉफ्टवेअर अपडेट करून म्हाडाने आवश्यक कागदपत्रांची संख्या 7 वर आणली आहे. लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना ही सात कागदपत्रे तयार ठेवावी लागतात. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, जातीचा दाखला आणि आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्या वर्गाचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Cyber Fraud in Thane: केवायसी अपडेटच्या नावाखाली, वृद्धाला 7.38 लाख रुपयांचा गंडा; ठाणे येथील घटना)
या घरांसाठी इच्छुक लोक अधिकृत वेबसाइट- lottery.mhada.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. साइटवरील पात्रता निकष तपासून अर्जदारांनी अर्ज काळजीपूर्वक भरला पाहिजे. अर्ज केल्यानंतर लोकांना किती फ्लॅट उपलब्ध आहेत याचीही माहिती मिळेल. अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदाराला अनामत रक्कम आणि अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी 4 मे 2023 सायंकाळी 6 वाजता वाजता प्रसिद्ध होईल आणि सोडत दिनांक 10 मे 2023 सकाळी 10 वाजता निघेल. म्हाडा कोकण मंडळ लॉटरी 2023 ची संपूर्ण जाहिरात आणि बूकलेट पीडीएफ पाहण्यासाठी MHADA Konkan Booklet या लिंकवर क्लिक करा.