Megablock 30th June: उद्या मुंबईच्या तीन ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवासाआधी जाणून घ्या वेळापत्रक

Megablock 30th June: उद्या मुंबईच्या तीन ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवासाआधी जाणून घ्या वेळापत्रक
Representational Image (Photo Credits: PTI)

मुंबईकरांच्या रविवारचा एक भाग म्हणजे मेगाब्लॉक! येत्या रविवारी म्हणजे उद्या 30 जून ला मुंबईतील मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बर (Harbour Railway)  अशा तीन ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock)घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे वर हा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बरवर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सुमारे 20 मिनिटे उशिराने होणार आहे. तर पश्चिम रेल्वे वर देखील वसई रोड यार्डच्या कामांसाठी सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे मात्र याचा उपनगरीय लोकलवर कोणताही परिणाम होणार नाही, असे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत नागरिकांनी गरज असल्यासच प्रवास करावा असा सल्ला रेल्वेने दिला आहे.

मध्य रेल्वे

माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कामांमुळे लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

वडाळा रोड ते मानखुर्द या स्थानकांच्या मध्ये अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक घेऊन रेल्वेचे काम करण्यात येणार आहे. ब्लॉक काळातील वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवासी सुविधेसाठी पनवेल ते मानखुर्द स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. हार्बर प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 पर्यंत मध्य आणि ट्रान्सहार्बरने प्रवास करण्याची सूट देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे

वसई रोड (यार्ड) च्या कामासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत 6 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे. मात्र उपनगरीय लोकल वेळापत्रकानूसार धावणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2019 05:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).