Medical Education In Marathi: 2023 शैक्षणिक वर्षापासून MBBS सह वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतूनही घेण्याचा पर्याय!
मध्य प्रदेशात वैद्यकीय शिक्षण हिंदी मधून खुले करून दिल्यानंतर आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण सुरू होणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे 2023 पासून वैद्यकीय अभ्यास हा मराठी भाषेमधून शिकवला जाणार आहे. दरम्यान मराठी भाषेतून वैद्यकीय अभ्यासक्रम बनवण्यासाठी मागील 2 महिन्यांपासून तयारी सुरू होती. यासाठी विविध तज्ञांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.
मराठी मधून वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय खुला करून दिला असला तरीही तो पर्याय असणार आहे. त्यासाठी बंधन नसणार आहे. विद्यार्थ्यांना मराठीतून वैद्यकीय शिक्षण हा संपूर्ण ऐच्छिक पर्याय असणार आहे. आता विद्यार्थी मराठी भाषेतून एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम शिकू शकतील.
16 ऑक्टोबर दिवशी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते भोपाळमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून उपलब्ध करून देणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हिंदी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण देखील शाह यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचे शिक्षण देण्यासाठी एकूण 62 महाविद्यालये आहेत. त्यात 10,045 विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये सरकार आणि महापालिकेची 27, खासगी 20, अभिमत विद्यापीठ 12 तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 3 मेडिकल कॉलेजेस आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण प्रादेशिक भाषेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता महाराष्ट्रातही वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध केले जाणार आहे. हा भाषेत बदल झाला असला तरीही अभ्यासक्रमामध्ये कोणताही फेरफार करण्यात आलेला नसल्याचं सांगण्यात आले आहे.