Matoshree Hostels: आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या महाविद्यालयीन वसतिगृहांना मिळणार ‘मातोश्री' नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय
सध्या अशी वसतिगृहे एकतर 'मुलांचे वसतिगृह' किंवा 'मुलींचे वसतिगृह' म्हणून ओळखली जातात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन वसतिगृहांचे नाव बदलून ‘मातोश्री’ (Matoshree) शासकीय वसतिगृह असे ठेवणार आहे. यासंदर्भात राज्याने मंगळवारी शासन ठराव (GR) जारी केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. वांद्रे (पू) येथील कला नगर येथे असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वैयक्तिक निवासस्थानाचे नाव 'मातोश्री' आहे. तसेच सध्या उच्च व तंत्रशिक्षण पोर्टफोलिओ शिवसेनेचे मंत्री उदय सामंत सांभाळत आहेत, म्हणून हा निर्णय घेतल्याचे विरोधकांनी म्हटले होते.
जीआरनुसार, कोणतीही विशिष्ट नावे नसलेली सर्व विद्यमान महाविद्यालयीन वसतिगृहांचे नाव बदलून ‘मातोश्री शासकीय वसतिगृह’ असे ठेवले जाईल. सध्या अशी वसतिगृहे एकतर 'मुलांचे वसतिगृह' किंवा 'मुलींचे वसतिगृह' म्हणून ओळखली जातात. जीआरमध्ये पुढे नमूद केले आहे की, यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या नवीन वसतिगृहांचे नाव 'मातोश्री' असे असेल, जी मुला-मुलींच्या वसतिगृहे म्हणून वर्गीकृत केली जातील. या वसतिगृहातील सुविधा विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत: च्या आईने पुरविल्याप्रमाणे निवारा देतील. तसेच त्या विद्यार्थ्यांच्या मनात प्रेमभावना निर्माण करतात, असे जीआरमध्ये नमूद केले आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती निकाल mahaarogyabharti.com वर जाहीर; असे पहा Cut Off मार्क्स आणि Merit List)
घराबाहेर असलेल्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आईचे प्रेम महत्वाचे असते. त्यामुळे त्यांना आईच्या प्रेमाची ऊब मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उदय सामंत म्हणाले होते.
याआधी रामटेक येथील कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठाच्या वसतिगृहाचे उद्घाटन मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले, ज्याचे नाव विद्यापीठाच्या कुलपतींनी ‘मातोश्री’ असे ठेवले आहे. राज्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण केली जातात. त्यात विद्यार्थ्यांना राहण्याची आणि खाण्याची सोय माफक दरात केली जाते. भविष्यात निर्माण केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या वसतिगृहांना ‘मातोश्री’ हे नाव दिले जाईल.