Shiv Sena Name & Symbol: उद्धव ठाकरे यांना 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' नावासह 'मशाल' चिन्ह; एकनाथ शिंदे गटाची तिन्ही चिन्हे फेटाळली, 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मात्र मिळाले

तसेच, उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' (Mashal) हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' (Shiv Sena of Balasaheb) हे नाव मिळाले आहे. चिन्हाच्या बाबतीत मात्र शिंदे गटाला अल्पसा धक्का मिळाला आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) आणि धनुष्यबाण हे पक्षाचे मूळ नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) कोणते नाव आणि चिन्ह मिळणार याबाबत उत्सुकता होती. ही उत्सुकता आज (10 ऑक्टोबर) सायंकाळी संपुष्टात आली. भारतीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) हे नाव मिळाले आहे. तसेच, उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' (Mashal) हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' (Shiv Sena of Balasaheb) हे नाव मिळाले आहे. चिन्हाच्या बाबतीत मात्र शिंदे गटाला अल्पसा धक्का मिळाला आहे. कारण शिंदे गटाने पहिल्या पसंतीचे म्हणून दिलेली तिन्ही चिन्हे निवडणूक आयोगाने फेटाळली आहेत. त्यामुळे शिंदे गटाला आता नव्या तीन चिन्हांसह आयोगाकडे मागणी करावी लागणार आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीत पक्षाचे नाव म्हणून 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', 'शिवसेना प्रबोधनकार ठाकरे', 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ही तीन नावे देण्यात आली होती. त्यात 'शिवेसेना बाळासाहेब ठाकरे' या नावासाठी ठाकरे गट आग्रही होता. शिवाय, चिन्हाच्या बाबतीत बोलायचे तर 'त्रिशूल', 'उगवता सूर्य' आणि 'मशाल' ही तीन चिन्हे मागीतली होती. त्यातील 'त्रिशूल' चिन्हासाठी ठाकरे गट आग्रही होता.

दुसऱ्या बाजूला, शिंदे गटानेही निवडणूक आयोगाकडे 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', 'बाळासाहेबांची शिवसेना', 'शिवसेना बाळासाहेबांची' ही तीन नावे आणि 'त्रिशूल', 'उगवता सूर्य' आणि 'गदा' ही नावे आग्रहाने मागितली होती. त्यापैकी 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव आयोगाने शिंदे गटाला दिले गेले. मात्र, तिन्ही चिन्हे आयोगाने बाद ठरवत नव्याने चिन्हे सादर करण्यासाठी आयोगाने शिंदे गटाला सांगितले.

दरम्यान, 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' हे नाव ठाकरे आणि शिंदे गटाने मागितल्याने ते बाद करण्यात आले. चिन्हाच्या बाबतीत सांगायचे तर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि धार्मिक बोधचिन्ह असल्याने 'त्रिशूल' हे चिन्ह देण्यास दोन्ही गटाला आयोगाने नकार दिला. 'उगवता सूर्य' हे नावही ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी मागितले होते. त्यामुळे तेही बाद करण्यात आले. शेवटी तिसऱ्या पर्यायाच्या चिन्हावर शिक्कामोर्तब करत उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' हे चिन्ह आयोगाने दिले. शिंदे गटाला मात्र त्यांनी सादर केलेल्या चिन्हांपैकी एकही चिन्ह मिळू शकले नाही. आता शिंदे गटाला आता नव्याने चिन्हासाठी अर्ज करावा लागणार आहे.