मुंबईत पार पडला खास पोलिसांसाठी 'स्वरतरंग 2018',अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी लावली हजेरी
खास मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या स्वरतरंग 2018 या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले होते
खास मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या 'स्वरतरंग 2018' या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले होते. झी मराठीची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई पोलिसांसाठी फार मोठा वार्षिक सोहळा असतो. प्रत्येक मुंबई पोलीस या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतो असतो. नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.
अशोक सराफ, वर्षा उसगांवर, महेश कोठारे, किशोरी शहाणे, मुक्ता बर्वे, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांच्या सानिध्यात या वर्षीचा हा कार्यक्रम चांगलाच रंगला. मुंबई पोलिसांनी खास ट्वीट करून चित्रपटसृष्टीमधील कलावंतांचे आभार मानले आहेत. चोवीस तास जनतेचे संरक्षण त्यांच्या समस्या यांसाठी नेहमीच तत्पर राहणाऱ्या पोलिसांसाठी हा कार्यक्रम म्हणजे मोठी पर्वणीच ठरतो
महेश कोठारे पुत्र आदिनाथ कोठारे याने यावर्षीच्या स्वरतरंगचे सूत्रसंचालन केले तर पुष्कर जोगचा परफॉर्मंस या कार्यक्रमाचे महत्वाचे आकर्षण ठरले. चित्रपटसृष्टीमधील नामवंत कलाकार, गायक, संगीतकार या कार्यक्रमात सामील झाले होते.